चरणजित सिंग चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेसने राज्यात पहिल्यांदा दलित मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करून पंजाबमध्ये इतिहास रचला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी दिली. तसेच “भाजप एका दलित नेत्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे. दलितांच्या नावाने मतं मागणाऱ्या मोदीजींच्या पक्षाने आतापर्यंत कधीच दलिताला मुख्यमंत्री का केले नाही, याचं उत्तर देशाला द्यावं,” असंही ते म्हणाले.

काँग्रेसकडून एका गरीब दलिताला पंजाबचे मुख्यमंत्री बनवण्यात आले, त्यामुळे भाजपा, आम आदमी पक्षासह इतर विरोधी पक्षांची पोटदुखी वाढली आहे, असा दावाही रणदीप सुरजेवाला यांनी केला. दरम्यान, चरणजित सिंग चन्नी यांनी आज सकाळी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. राजभवनात हा शपथग्रहण सोहळा पार पडला. चन्नी यांच्या व्यतिरिक्त पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते.

शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर चरणजित सिंग चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्यात आली. रविवारी दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं. चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री झाले आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड यांच्या नावांची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चेत सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव होतं. मात्र, या सर्व नेत्यांना डावलून पंजाबमधील दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.