DY Chandrachud : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे ८ महिन्यांपूर्वी सेवेतून निवृत्त झाले. मात्र, निवृत्त होऊन ८ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी देखील त्यांनी त्यांचं सरकारी निवासस्थान सोडलं नाही. ते अद्याप सरकारी निवासस्थानात राहत असल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने याबाबत केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं. या पत्राच्या माध्यमातून डीवाय चंद्रचूड यांचं सरकारी निवासस्थान खाली करण्याची विनंती करण्यात आली.
डीवाय चंद्रचूड यांनी लवकरात लवकर त्यांचं सरकारी निवासस्थान सोडावं, अशी मागणी सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने केंद्र सरकारकडे केली. याबाबत १ जुलै रोजी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाला पत्र पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यावर अद्याप केंद्र सरकारची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच या पत्रावर केंद्र सरकारच्या उत्तराची वाट सर्वोच्च न्यायालय प्रशासन पाहत आहे. मात्र, यावर आता डीवाय चंद्रचूड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
तसेच अद्याप सरकारी निवासस्थान का सोडलं नाही? यांचं कारणही डीवाय चंद्रचूड यांनी सांगितलं आहे. या बरोबरच सरकारी निवासस्थान सोडण्यासाठी झालेल्या विलंबाचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे. चंद्रचूड यांनी म्हटलं की, “विद्यमान सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्याशी दूरध्वनीवरून त्यांनी संवाद साधला होता. त्यांना कळवलं होतं की सरकारने त्यांना भाड्याने एक निवासस्थान दिलं आहे. पण काही दुरुस्ती कराव्या लागल्यामुळे कंत्राटदाराने ३० जूनपर्यंत देण्याचं आश्वासन दिलं होतं”, असं डीवाय चंद्रचूड यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
डीवाय चंद्रचूड यांनी पुढे असंही म्हटलं की, “आता फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. आम्ही कंत्राट दाराकडून योग्य उत्तराची वाट पाहत आहोत. कदाचित काही काम शिल्लक राहिलं असेल आणि म्हणून विलंब झाला असेल. आम्हाला देण्यात येत असलेलं निवासस्थान जवळपास दोन वर्षांपासून वापरात नव्हतं, म्हणूनच दुरुस्ती करावी लागत आहे. तसेच आमच्या दोन मुलींच्या योग्य त्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य घर शोधण्यात अडचण येत होती”, असं स्पष्टीकरण डीवाय चंद्रचूड यांनी दिलं आहे.
चंद्रचूड यांनी पुढे असंही म्हटलं की, “न्यायाधीशांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानात राहण्यासाठी मुदतवाढ देणे ही अपवादात्मक गोष्ट नाही. मी याआधी तुघलक रोड १४ या निवासस्थानी राहत होतो. सरन्यायाधीश झाल्यानंतर देखील तिथेच राहत होतो, कारण कुटुंबाला ते ठिकाण आवडलं होतं. मात्र, सरन्यायाधीश झाल्यानंतर काही महिन्यांनी मला जाणवलं की, ही जागा कामासाठी खूपच लहान आहे. त्यामुळे मी सरन्यायाधीश झाल्याच्या काही महिन्यांनी कृष्णा मेनन मार्गावरील निवासस्थानी राहायला गेलो होतो”, असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.