ब्लू ड्रम हत्याकांड प्रकरणाने देशभरात चर्चा झालेल्या मेरठ हत्याकांडाने खळबळ उडाली होती. मर्चंट नेव्हीत काम करणाऱ्या सौरभ राजपूतची हत्या त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांनी केली. एवढ्यावरच हे दोघं थांबले नाहीत तर सौरभच्या मृतदेहाचे १५ तुकडे करून ते एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये भरले होते. त्यामुळेच हे हत्या प्रकरण ब्लू ड्रम हत्याकांड म्हणून देशभरात ओळखलं गेलं. या प्रकरणात न्यायालयाने मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीशांनी पेन का फेकून दिलं आपण जाणून घेऊ.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
साहिल आणि मुस्कान या दोघांना कलम ३०२ अंतर्गत असलेल्या तरतुदीननुसार ५० हजार हजार रूपये दंड तसंच कलम २३८ ए च्या अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार २० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला अशी माहिती वकील कृष्ण कुमार दुबे यांनी दिली. तसंच त्यांनी हेदेखील सांगितलं न्यायाधीश म्हणाले देशातल्या प्रत्येकाचं आजच्या खटल्याच्या निकालाकडे लक्ष आहे की नेमकी या दोघांना हत्या प्रकरणात काय शिक्षा सुनावली जाणार. जे कृत्य या दोघांनी केलं ते माणुसकीला काळीमा फासणारं आहे. तसंच संपूर्ण देशाला या घटनेमुळे धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येते आहे असं न्यायाधीशांनी जाहीर केलं.न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी शिक्षा सुनावत असताना महाभारताचंही उदाहरण दिलं. अपराध्यांना शासन हाच धर्म आहे. शिक्षा सुनावली जात असताना साहिल आणि मुस्कान या दोघांनाही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केलं गेलं होतं. फाशीची शिक्षा सुनावली गेल्यानंतर दोघंही रडायला लागले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
बचाव पक्षाने प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही
कृष्ण कुमार दुबे म्हणाले की या दोघांनाही कुणीही हत्या करताना पाहिलेलं नाही. तसंच या दोघांना मुलं आहेत त्याचा विचार न्यायालयाने केला पाहिजे असा बचाव या दोघांच्या वकिलांनी केला. पण आम्ही या प्रकरणाचे सगळे सबळ पुरावे दिले. त्यानंतर सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन न्यायाधीशांनी या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली. एका व्यक्तीची हत्या करून त्याचे तुकडे करून ड्रममध्ये भरण्यात आले. याचाच अर्थ हा पूर्वनियोजित कट होता, त्यामुळे या दोघांना दया दाखवण्याचा काही प्रश्नच येत नाही असंही न्यायाधीश म्हणाले. या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, पण आणखी एक महत्वाची बाब ही आहे की एखाद्या महिलेला अशा प्रकरणात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांचं पेन फेकून दिलं.

शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश अरविंद कुमार यांनी पेन का फेकलं?
साहिल शुक्ला आणि मुस्कान रस्तोगी या दोघांनाही सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी ज्या पेनने हा निर्णय लिहिला होता आणि त्यावर सही केली होती ते पेन फेकून दिलं. आरोपीला जेव्हा फाशीची शिक्षा दिली जाते त्यानंतर पेनाची निब मोडण्याची प्रथा आहे किंवा पेन नष्ट करण्याची न्यायालयीन प्रथा आहे. या प्रथेचा अर्थ हा आहे की जो निर्णय दिला आहे त्याच्याशी आपला संबंध तोडून टाकण्याचं प्रतीक म्हणून हे केलं जातं. निर्णय दिल्यानंतर आता त्यापुढील परिणाम काय होतात त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी न्यायाधीश हे करतात. हाच संकेत पाळत हे पेन न्यायाधीशांनी फेकून दिलं.
