काँग्रेस नेते अलीकडेच पाकिस्तानच्या नेत्यांना भेटले, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील सभेला संबोधित करताना म्हटले होते. मोदींच्या या टीकेला उत्तर देताना, कोणत्या सरकारने पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना हवाई दलाच्या पठाणकोट तळावर येण्याची परवानगी दिली?, असा सवाल करत काँग्रेसने पलटवार केला आहे.

पाकिस्तान गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत असून, काँग्रेस नेते अलीकडेच पाकिस्तानच्या नेत्यांना कशासाठी भेटले, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालनपूर येथील प्रचारसभेत केली होती. मोदींच्या या टीकेला उत्तर देताना ‘पाकिस्तानवर खरं प्रेम कोणाचे आहे?’ असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. ‘पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबातील एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान वाट वाकडी करुन पाकिस्तानला गेले. यावरुन पाकिस्तानवर कोणाचे प्रेम आहे, हे दिसते,’ अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

‘पाकिस्तानवर कोणाचे प्रेम आहे? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच माहीत आहे. उधमपूर (ऑगस्ट २०१५) आणि गुरदासपूर (जुलै २०१५) या ठिकाणी दहशतवादी हल्ले होऊनही कोण पाकिस्तानला गेले? कोणतेही निमंत्रण नसताना पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातीच्या लग्नासाठी कोणी पाकिस्तानला भेट दिली?’, असे प्रश्न सुरजेवाला यांनी उपस्थित केले आहेत. मोदींनी २०१५ च्या डिसेंबर महिन्यात पाकिस्तानला भेट दिली होती. त्यांची ही भेट अनियोजित स्वरुपाची होती.

मोदी सरकार आणि पाकिस्तानचे संबंध संशयास्पद असल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले. ‘त्यांना गुजरातची निवडणूक पाकिस्तानच्या मुद्द्यावर लढवायची असल्यास, आयएसआयच्या (पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा) अधिकाऱ्यांना पठाणकोटसारख्या अतिशय संवदेनशील हवाई तळावर येण्याचे निमंत्रण कोणी दिले?, याचे उत्तर त्यांनी द्यावे.’ असे ते म्हणाले. ‘आम्हाला पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेवर विश्वास असून त्यांच्याकडून नक्कीच त्यांच्या मायभूमीतील हल्लेखोरांचा तपास केला जाईल, असे त्यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहांनी म्हटले होते. भाजपचे अध्यक्ष पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेवर विश्वास दाखवत असताना मोदीजी तुम्ही आम्हाला पाकिस्तानबद्दल प्रश्न काय विचारता?’ असा जोरदार पलटवार काँग्रेसने केला आहे.