दिल्लीतील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच हत्या करणारा साहिल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं समोर आलं आहे. त्याने याआधीही स्थानिक मुलांना मारहाण केल्याची पोलीस तक्रार आहे. पोलीस सध्या त्याच्या इतर अनेक गुन्ह्यांची उकल करत आहेत.
साहिलची सखोल चौकशी सुरू आहे. त्याने याआधी केलेल्या कृत्यांची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. तो एका स्थानिक टोळीशी संबंधित असल्याचंही समोर आलं असून तो अल्पवयीन असताना त्याने एका तरुणावर गोळीबारही केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल दोन वर्षांपूर्वी शाहबाद डेअरी भागातील जेजे कॉलनी डी ब्लॉक स्ट्रीट नंबर पाचमध्ये राहत होता. येथे साहिलचे एका तरुणासोबत भांडण झाले. साहिलने त्याला मारहाण केली होती. या मारहाणीमुळे तरुणाच्या डोक्याला १४ टाके पडले होते. याप्रकरणी पोलिसांतही तक्रार करण्यात होती. परंतु, पोलिसांनी सौम्य कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर साहिल आणि त्याचे कुटुंब जेजे कॉलनीतील घर सोडून जैन कॉलनीत राहायला गेले होते.पोलिसांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल हा श्रीकृष्ण ग्रुपशी संबंधित आहे. या टोळीतील सदस्यांची या परिसरात दहशत आहे.
हेही वाचा >> Video: दिल्लीत अल्पवयीन मुलीला २० वेळा भोसकणारा साहिल निर्ढावलेलाच; पोलीस तपासात म्हणतो, “अजिबात पश्चात्ताप नाही!”
याच भागात साहिल अल्पवयीन असताना एका तरुणावर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. पण पोलीस अधिकाऱ्याने साहिलविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता.
आई आजारी म्हणून घातला दोरा
दरम्यान, साहिलचा फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्या हातातील दोऱ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. याबाबतही मोठा खुलासा समोर आला आहे. साहिलची आई सतत आजारी असते. त्यामुळे तिला बरं वाटावं याकरता त्याने हाता दोरा आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आहे. परंतु, साहिलच्या या दाव्यावर पोलिसांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे त्याने दिलेल्या विधानाची आता पडताळणी करण्यात येणार आहे.
रागातून केली हत्या!
दरम्यान, पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या विकृताचे मृत अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. पण गेल्या काही दिवसांपासून तिनं त्याच्यापासून लांब राहायला सुरुवात केली होती. नात्याला नकार दिला होता. यामुळे त्या विकृताचा संताप अनावर झाला. या मुलीनं त्याला खोटी पिस्तुल दाखवून लांब राहण्यासाठी धमकावलंही होतं अशी माहितीही समोर आली आहे. रविवारी दारुच्या नशेत या आरोपीनं तिला गाठलं आणि तिची निर्घृण हत्या केली.
२० दिवसांपूर्वीच खरेदी केला होता चाकू
दरम्यान, आरोपीनं २० दिवसांपूर्वीच या मुलीची हत्या करण्यासाठी चाकू खरेदी केला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोपी साहिलनं मुलीची हत्या नियोजनपूर्वक किंवा ठरवून केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात दिल्ली पोलीस अधिक तपास करत असून सध्या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.