पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशीच एक घटना घडली आहे ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान करण्यात आलं. दरम्यान भाजपा उमेदवार सुवेंदू सरकार यांना टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी पळवून पळवून मारलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आपण जाणून घेऊ.
सुवेंदू सरकार यांना पळवून पळवून मारलं
भाजपाचे उमेदवार सुवेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण करण्यात आली आहे. दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात कुमारग्राम विधानसभा क्षेत्रात कुमारगंज येथील उमेदवार सुवेंदू सरकार यांना पळवून मारहाण करण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप होतो आहे. सुवेंदू सरकार आणि तृणमूलच्या समर्थकांमध्ये आधी बाचाबाची झाली. ज्यानंतर वाद इतका वाढला की हे कार्यकर्ते सरकार यांच्या मागे लागले आणि त्यांना मारहाण केली. सरकार यांचे अंगरक्षक त्यांच्यासह उपस्थित होते. त्यांनी सरकार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तृणमूलचे कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की अंगरक्षकांनाही काही करता आलं नाही.
सुवेंदू सरकार यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल
सुवेंदू सरकार यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जेव्हा त्यांना पळवून पळवून मारण्यात आलं. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक यांचा जमाव वाढला आणि ही घटना घडली. सुवेंदू सरकार हे भाजपाचे उमेदवार आहेत. पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्यांच्यासह त्यांचे अंगरक्षक वगळता दुसरी सुरक्षा व्यवस्था नव्हती. तसंच केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान किंवा पोलीस किंवा कुठलीही विशेष व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यांना मारहाण होत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते?
दक्षिण दिनाजपूर भागातील कुमारगंज विधानसभा क्षेत्रामधील एका ठिकाणी मतदान केंद्र हायजॅक करण्यात येत असल्याची माहिती भाजपचे उमेदवार सुवेंदू सरकार यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच सुवेंदू सरकार हे काही लोकांसह तिथे पोहोचले होते. पण, तिथे जाताच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सुवेंदू सरकार यांना पळवून-पळवून लाथा बुक्क्या आणि काठीने मारहाण करण्यात आली. तिथे पोलीसही उपस्थित होते, परंतु तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना मारतच राहिले. सगळी घटना घडताना पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते असाही आरोप होतो आहे.
सुवेंदू सरकार यांची प्रतिक्रिया नेमकी काय?
सुवेंदू सरकार यांची या घटनेनंतरची प्रतिक्रिया समोर आली आहे, ते म्हणाले कुमारगंज विधानसभा क्षेत्रात आम्ही पोलिंग एजंट्सना ८ ते १० ठिकाणांहून बाहेर काढलं. मी तिथे स्वतः गेलो होतो. मी जेव्हा २४ क्रमांकाच्या बूथवर गेलो होतो तिथे माझ्यावर हल्ला करण्यात आला होता. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मी तिथे पोहचलो तेव्हा माझ्याबरोबर एकच अंगरक्षक होता. याच परिस्थितीचा फायदा घेऊन माझ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असा आरोप सुवेंदू सरकार यांनी केला आहे. टीएमसीच्या लोकांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतो आहे, त्यामुळे माझ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला असंही सुवेंदू सरकार म्हणाले.
सुवेंदू सरकार यांच्या कानाला जखम
जमावाची आक्रमकता वाढल्यानंतर सुवेंदू सरकार यांना तेथून पळ काढावा लागला. या घटनेत सुवेंदू सरकार हे गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्या कानाला जखम झाली आहे. तर, त्यांच्या कारचीही तोडफोड तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कोण आहेत सुवेंदू सरकार?
सुवेंदू सरकार हे पश्चिम बंगालच्या कुमारगंज मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आहेत.
सुवेंदू सरकार हे ५१ वर्षांचे आहेत.
सुवेंदू सरकार यांना प्रचंड प्रमाणात मारहाण झाल्याने ते आता चर्चेत आले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी काय माहिती दिली?
प्रत्यक्षदर्शींनी सुवेंदू सरकार यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती माध्यमांना दिली. सुवेंदू सरकार आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी सुवेंदू सरकार यांच्यासह एकच अंगरक्षक आहे हे पाहिलं. फारशी सुरक्षा व्यवस्था सरकार यांच्यासह नसल्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात झाली. ही घटना चिघळली आणि त्यानंतर सुवेंदू सरकार यांना पळवून पळवून मारण्यात आलं. खरंतर इतका काही वाद होईल किंवा सरकार यांना अशा प्रकारे मारहाण केली जाईल असं वाटलं नव्हतं, पण ही घटना आमच्यासमोर घडली. जमाव इतका वाढला होता की पोलिसांना काही करता आलं नाही असंही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
