टाटा या नावातच ब्रँड लपला आहे. याच टाटा कंपनीत वाद रंगला आहे. टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट यांच्यातला हा वाद आहे. नेमका हा वाद काय? हा वाद का रंगला आहे? याबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी लोकसत्ताचा विशेष कार्यक्रम दृष्टिकोन यात भाष्य केलं आहे.
काय म्हणाले आहेत गिरीश कुबेर?
“रतन टाटांच्या नंतरचा हा वाद आहे. त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. रतन टाटा यांची जेव्हा नेमणूक होणार होती तेव्हाही असाच वाद झाला होता. तेव्हा टाटा स्टिल टिस्को असं नाव होतं. रूसी मोदी यांनी रतन टाटांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी एक व्यक्ती रतन टाटांच्या मागे ठामपणे उभी राहिली ती म्हणजे शापुरजी पालनजी. शापुरजी पालनजी यांनी रतन टाटांच्या पारड्यात वजन टाकलं. कारण जेआरडी तेव्हा थोडे साशंक होते. कारण एकापेक्षा एक तगडी माणसं त्यावेळी होती. त्यामुळे रतन टाटांच्या हाती धुरा दिल्यावर काय होईल असं त्यांना वाटलं होतं. पण रतन टाटांना नंतर स्थिरस्थावर होता आलं. मग सायरस मिस्त्रींवरूनही वाद झाला आणि आताचा जो वाद रंगला आहे तो. या तिन्ही वादांमधला आताचा वाद जास्त गंभीर आहे. रूसी मोदींनी काही काळासाठी त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना सांगितलेला काहीसा हस्तक्षेप सोडला तर राजकीय हस्तक्षेपाला या वादात स्थान नव्हतं. पण आत्ताच्या वादात ते मिळालेलं दिसतं आहे. उघडपणे त्याचे पुरावे दाखवता येणार नाहीत. पण ज्या विषयाचा अर्ज टाटा सन्सने २०२४ मध्ये केला होता त्यावरचा निर्णय द्यायला रिझर्व्ह बँकेला दोन वर्षे लागली. तो निर्णय रिझर्व्ह बँकेच्या एकट्याच्या जिवावर असूच शकत नाही. त्यानंतर शापुरजी पालनजी समूहाच्या वतीने रिझर्व्ह बँकेचे आभार मानले गेले आणि मोदींबाबत स्तुतीसुमनं उधळली गेली तेव्हाच स्पष्ट झालं की या वादामागे दिल्लीचा हात आहे.”
या वादामागे महाशक्ती आहे-गिरीश कुबेर
गिरीश कुबेर पुढे म्हणाले, “बाजारावर अशा निर्णयांचा परिणाम होतच असतो. पण हे मुद्दे तात्कालीक असतात. टाटा समूहाचं वैशिष्ट्य काय तर त्यांनी फायद्यापेक्षा देशाचा विचार करून त्यांनी प्रकल्प राबवले. आत्ताही ज्यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू आहेत ते सत्ताधाऱ्यांना कसे जवळचे प्रकल्प राबवत होते ते फायनान्शिअल टाइम्सने दिलं होतं. काहीशी अस्थिरता निर्माण होते पण पुढे काय होईल हे काळजीचं वाटतं. कारण टाटा समुहाची रचना. रिझर्व्ह बँकेला यांच्याबाबतीतच आक्षेप घेतला गेला. दोन वर्षे त्यावर बसून आहेत. पण आत्ताच टायमिंग साधलं गेलं.
इथे पाहा संपूर्ण व्हिडीओ
चंद्रशेखर तमिळ असणं, निर्मला सीतारमण तमिळ असणं या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. पुतिन यांनाही तमिळ पुस्तक भेट दिलं गेलं. सध्याची गरज ही शापुरजी पालनजी समूहाला आहे. कारण तो समूह आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने पत्रक काढून पंतप्रधानांचे आभार मानले. एकनाथ शिंदे आमदारांसह सुरत मार्गे गुवाहाटीला पोहचले होते तेव्हा त्यांचं वाक्य होतं की आपल्यामागे महाशक्ती आहे. तसंच या वादामागे महाशक्ती आहे. महाशक्तींना आड येणारे असा हा संघर्ष आहे.”
