‘शूल’ या १९९९ साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात एक गमतीदार प्रसंग आहे. त्याची आठवण व्हावी असा किस्सा बुधवारी लोकसभेत घडला. त्याने उपस्थित खासदारांची चांगलीच करमणूक झाली.   ‘शूल’मध्ये अभिनेता सयाजी शिंदे यांनी बिहारमधील एका भ्रष्ट आणि गुंड आमदाराची भूमिका केली आहे. एका प्रसंगात ते विधानसभेत एक आमदार एका ठिकाणी छोटे धरण बांधून पाण्याचा प्रश्न मिटवण्याची सूचना करतो. तसेच त्यातून वीजनिर्मितीही करता येईल असे सांगतो. पण हा गुंड आमदार त्याला तावातावाने विरोध करत म्हणतो की, पाण्यातून वीज काढणे म्हणजे माणसातून त्याचा प्राण काढण्यासारखे आहे. अशा कस काढलेल्या पाण्यावर शेती कशी पिकणार? अगदी तशाच थाटात बुधवारी नगरचे भाजप खासदार दिलीपकुमार गांधी यांनी भूगोलविषयक मंत्री हर्षवर्धन यांना प्रश्न केला की, नुकत्याच झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आपले मंत्रालय गारपीट रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहे? असा सवाल केला.