NITI Aayog Report Unemployment Graduate Jobs Skill Gap: देशात दरवर्षी पदवीधरांची संख्या विक्रमी वेगाने वाढत असली, तरी प्रत्यक्षात शिकलेल्या विषयानुरूप नोकरी मिळणाऱ्या तरुणांचे प्रमाण अवघे ८.२५ टक्के असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निती आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘रीइमॅजिनिंग स्किलिंग फॉर विकसित भारत @२०४७’ या अहवालात ही आकडेवारी मांडण्यात आली असून, देशातील बेरोजगारीपेक्षाही ‘शिक्षण आणि उद्योगजगताची गरज’ यातील तफावत अत्यंत गंभीर वळणावर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पीय आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ चा संदर्भ देत निती आयोगाने म्हटले आहे की, उच्च आणि तांत्रिक शिक्षण प्रणालीमध्ये शिकवले जाणारे विषय आणि बाजारातील प्रत्यक्ष मागणी यात ताळमेळ राहिलेला नाही. अनेक संस्थांमधील अभ्यासक्रम कालबाह्य झाले असून पदवी किंवा प्रमाणपत्रे मिळूनही तरुणांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्यांचा प्रचंड अभाव दिसून येत आहे.

पारंपरिक पदव्यांचा फुगवटा आणि रोजगाराचा अभाव

देशात पदवी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या ३.४ कोटी विद्यार्थ्यांपैकी एकट्या बीए शाखेत १.१३ कोटी विद्यार्थी आहेत; तर बीकॉम आणि बीएससी या पारंपरिक शाखांमध्ये तब्बल दोन कोटींहून अधिक तरुण शिक्षण घेत आहेत. मात्र या पदव्या थेट रोजगार मिळवून देण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले होते. “आपले प्रचलित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ना नोकरीसाठी तयार करतात, ना उद्योजक बनण्यासाठी,” अशी परखड टिप्पणी त्यांनी केली होती. अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्रात बीए आणि एमए केल्यानंतरही संशोधनाचा मार्ग वगळता या तरुणांपुढे नेमकी कोणती व्यावसायिक दिशा असते, असा सवाल सीतारामन यांनी उपस्थित केला होता.

८० टक्के विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाची उणीव

अहवालानुसार, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी केवळ आकडेवारीत नसून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या अनुभवातही स्पष्ट जाणवत आहेत. ८० टक्के विद्यार्थ्यांच्या मते, अभ्यासक्रमात प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि प्रात्यक्षिकांचा अभाव ही सर्वात मोठी अडचण आहे.

३४ टक्के तरुणांनी कौशल्यांच्या अभावामुळे नोकरी मिळण्यात अडचणी येत असल्याचे नमूद केले. १८ टक्के विद्यार्थ्यांना मुलाखतीची तयारी कशी करावी याचे कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही.

Graduate jobs skill gap and youth employment challenge
नीती आयोगाच्या ‘रीइमॅजिनिंग स्किलिंग फॉर विकसित भारत @२०४७’ अहवालातून रोजगारासंबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Photo – AI / Chatgpt)

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्याला हिशोबाचे प्राथमिक ज्ञान असले तरी ‘टॅली’ किंवा डिजिटल टूल्स वापरता येत नाहीत; अर्थशास्त्राचा पदवीधर कंपनीचे आर्थिक विश्लेषण करू शकत नाही, अशी परिस्थिती असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

सरकारी नोकऱ्यांवर अवाजवी भार

खासगी क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये नसल्यामुळे पदवीधरांचा मोर्चा सरकारी नोकऱ्यांकडे वळत असल्याचे चित्र आहे. निती आयोगाच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत सरकारी क्षेत्रातील अवघ्या ५५ हजार पदांसाठी १ कोटी ८६ लाख अर्ज आले होते.

केवळ सरकारी नोकऱ्या वाढवणे हा या समस्येवरचा उपाय नसून, शिक्षण व्यवस्थेने स्वयंरोजगार, कौशल्याधारित उद्योग आणि उद्योजकतेसाठी आवश्यक सक्षम वातावरण तयार केले पाहिजे, अशी भूमिका अहवालात मांडण्यात आली आहे. महाविद्यालये आणि उद्योग जगतातील ही दरी भरून काढण्यासाठी इंटर्नशिप आणि अद्ययावत प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची तातडीने गरज व्यक्त केली जात आहे.