Tej Pratap Yadav criticizes Rahul Gandhi for not visiting Ayodhya: काँग्रेस- राजद (आरजेडी) युतीवर भाष्य करताना जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेज प्रताप यादव यांनी राहुल गांधींवर बोचरी टीका केली. राहुल गांधी ‘फटफटी’ बहाद्दर असून, ते एक घाबरट नेते आहेत, अशी टीका तेज प्रताप यांनी केली. राहुल गांधी अजून अयोध्येला का गेले नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी घाबरट नेते

तेज प्रताप यादव म्हणाले की, “राहुल गांधी ‘फटफटी’ (मोटारसायकल) बहाद्दर आहेत. ‘फटफटी’ चालवणे आणि ‘चिकन-भात’ बनवणे हेच त्यांचे काम आहे. राहुल गांधी एक घाबरट नेते आहेत. अयोध्येला जाऊन त्यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार असल्याचे ते म्हणाले होते, मात्र अद्याप ते गेलेले नाहीत. ते अयोध्येला का गेले नाहीत? त्यांनी जायला हवे होते की नाही? केवळ फटफटी फिरवून आणि प्रदूषण पसरवून काही साध्य होणार आहे का?…”

तेजस्वींच्या नियुक्तीवर भाष्य

तेजस्वी यादव यांची राजदच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बोलताना तेज प्रताप म्हणाले की, “त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यामुळे त्यांनी ती योग्यरीत्या पार पाडली पाहिजे. यापेक्षा आम्ही अधिक काय बोलणार? ज्या कोणावर जबाबदारी दिली जाते, त्याने ती पूर्ण केलीच पाहिजे.”

रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्याबद्दल केलेल्या ट्विटवर भाष्य करताना ते म्हणाले की, “त्यांनी केलेले ट्विट १०० टक्के बरोबर आहे. जर त्यांनी (लालू यादव) हा निर्णय घेतला असेल, तर त्यांना नक्कीच ते योग्य वाटले असावे. ही चांगली बाब आहे. आमची माणसे प्रगती करत आहेत, पुढे जात आहेत…”

तेजस्वी यादव यांची राजदच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती

तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय जनता दलाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी स्वत: नियुक्तीचे पत्र तेजस्वी यांना दिले. यावेळी राबडी देवीही उपस्थित होत्या. तेजस्वी यांच्या या नियुक्तीवर पक्षाचे नेते संजय यादव, मीसा भारती, अलोक कुमार मेहता यांच्यासह विविध नेत्यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

तेजस्वींवर शुभेच्छांचा वर्षाव

“आरजेडीला अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष असे दोन्ही सक्षम नेतृत्व लाभले असून, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू”, असे मीसा भारती म्हणाल्या. “तेजस्वी यादव तरुण आहेत, मात्र त्यांना १५ वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. त्यांनी संघटनेत तब्बल १५ वर्षे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. लालू प्रसाद यादव यांची विचारसरणी आपण अधिक जोमाने पुढे नेऊ आणि संपूर्ण देशात आरजेडीचा झेंडा फडकवू, असा विश्वास तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला आहे,” असे संजय यादव म्हणाले.