राजस्थानमधील पाण्याची स्थिती देशातील इतर अनेक राज्यांपेक्षा भीषण असताना महाराष्ट्रातील दुष्काळामुळे तेथून बाहेर हलविण्यात आलेले आयपीएलचे सामने जयपूरमध्ये का, असा प्रश्न गुरुवारी राजस्थान उच्च न्यायालयाने उपस्थित केला. त्याचबरोबर याबद्दल आपली बाजू मांडण्याचे आदेश राजस्थान सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिले आहेत.
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे मुंबई आणि पुण्यातून बाहेर हलविण्यात आलेले काही सामने जयपूरमध्ये खेळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यावर जयपूरमधील मुक्त पत्रकार महेश परीक यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, याचिकेवर निर्णय येत नाही, तोपर्यंत हे सामने खेळवण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.
याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालय म्हणाले की, देशातील इतर अनेक राज्यांच्या तुलनेत राजस्थानमधील पाण्याच्या उपलब्धतेची स्थिती अधिक भीषण आहे. मग महाराष्ट्रातून दुष्काळामुळे बाहेर हलविण्यात येणारे सामने जयपूरमध्ये का घेण्यात येत आहेत, याबद्दल राजस्थान सरकार आणि बीसीसीआयने बाजू मांडावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. येत्या बुधवारपर्यंत बाजूं मांडण्यात यावी, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्याच दिवशी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.