scorecardresearch

“नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यापासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना दूर का ठेवलं जातंय?” संजय राऊत यांचा सवाल

राष्ट्रपतींना द्रौपदी मुर्मूंना नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यापासून दूर का ठेवलं जातं आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

What Sanjay Raut Said?
नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावरुन संजय राऊत आक्रमक (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावरुन सुरु झालेला वाद संपलेला नाही. कारण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना या सोहळ्यापासून दूर का ठेवलं जातं आहे हे मोदींनी समोर येऊन सांगावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ऑस्ट्रेलियात लोकशाही आहे, पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी पाय धरले याचे कसले गोडवे गात आहात? असाही सवालही संजय राऊत यांनी केला आहे. आम्हीच निर्णय घेणार, आम्हीच ठरवणार, राष्ट्रपती कोण? सरन्यायाधीश कोण? आम्हीच सार्वभौम या मानसिकतेतून हे घडतं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपाकडून आमच्यावर टीका केली जाते आहे पण..

एक लक्षात घेतलं पाहिजे की भाजपा आमच्यावर टीका करते आहे. मात्र आम्ही फक्त विरोधासाठी विरोध करत नाही. हा संविधानाच्या सन्मानाचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसदेचं उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याची जी निमंत्रण पत्रिका आहे त्यावर राष्ट्रपतींचं नाव नाही, तसंच उपराष्ट्रपतींचंही नाव नाही. याविषयी कुणी काहीही बोलत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. नव्या संसदेच्या मुद्द्यावरुन ते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

नवी संसद ही काही कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही

नवी संसद ही काही कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. मात्र आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. आता उदाहरणं इंदिरा गांधी आणि राजीव गांधींची दिली जात आहेत. त्यांनी अतिरिक्त इमारत आणि वाचनालयाचं भूमिपूजन केलं होतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्हाला निमंत्रण मिळालं आहे. बड्या लोकांचं लग्न समारंभ असतो तेव्हा सगळ्या गावाला निमंत्रण दिलं जातात. आमचा मुद्दा हा आहे की राष्ट्रपतींना निमंत्रण का नाही? आडवाणी का गायब आहेत? असाही प्रश्न संजय राऊत विचारला आहे. आमचा नवीन संसद भवनला किंवा उद्घाटन सोहळ्याला विरोध नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतींना दूर का ठेवलं हा मूळ प्रश्न आहे.

शिंदे-मिंधे गट यांना मी पक्ष मानतच नाही

कोण शिंदे-मिंधे गट ? मी पक्ष म्हणून त्यांच्याकडे बघत नाही. तो गट म्हणजे भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात तसं आहे. कधीही कोंबड्या कापल्या जातील. बोलायला सकाळ, संध्याकाळ कोंबड्या-कोंबडे आरवत असतात तसं ते करत आहेत. पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय विचारधारा आहे? काय बैठक आहे? निवडणूक आयोगाने एक निर्णय विकत दिला म्हणून पक्ष होत नाही. शिंदे गटाने ४८ जागा लढवाव्यात. आम्हाला काही फरक पडत नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 10:38 IST

संबंधित बातम्या