Ayatollah Ali Khamenei Death Iran Israel War: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाले. १५ दिवसानंतरही युद्ध शमलेले नाही. युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिका-इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते ८६ वर्षीय अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि काही कुटुंबियही मृत्यूमुखी पडले. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर खामेनी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तेहरानमधील निवासस्थान सोडून सुरक्षित ठिकाणी किंवा बंकरमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र खामेनी यांनी हा सल्ला नाकारत घरीच थांबण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे त्यांची भावना काय होती, याबद्दल त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याने माहिती दिली आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे जवळचे सहकारी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी इंडिया टुडे वाहिनीच्या कॉन्क्लेव्हमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले, खामेनी यांनी दुसरीकडे सुरक्षित स्थळी किंवा बंकरमध्ये जाण्यास नकार दिला होता. जर इराणमधील ९ कोटी जनतेला सुरक्षित जागा नसेल तर मीही सुरक्षित ठिकाणी जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता.

इराणचे ३७ वर्ष सर्वोच्च नेतेपद भूषविणाऱ्या खामेनी यांनी सुरक्षित स्थळी जाण्याऐवजी राजधानी तेहरानमधील निवासस्थानीच थांबणे पसंत केले होते. यानंतर अमेरिका-इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ते मारले गेले.

अब्दुल माजिद हकीम इलाही म्हणाले, “खामेनी यांचे तेहरानमधील निवासस्थान आणि कार्यालय सर्वांना परिचित आहे. त्यामुळे खामेनींना सुरक्षित स्थळी का हलविले जात नाही, असा प्रश्न मी त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना विचारला होता. तर त्यांनी सांगितले की, खामेनींनी यासाठी नकार दिला आहे. ते म्हणाले, इराणच्या ९ कोटी लोकांना तुम्ही असेच सुरक्षित ठिकाण देणार असाल तर मी त्याठिकाणी जायला तयार आहे.”

अब्दुल माजिद हकीम इलाही पुढे म्हणाले, “मी सुरक्षा अधिकाऱ्यांना पुढे विचारले की, खामेनी इतर ठिकाणी जायला तयार नसतील तर त्यांना त्यांच्याच निवासस्थानी बंकर बांधून तिथे का पाठवले जात नाही. तर त्यावर अधिकारी म्हणाले की, त्यांनी बंकरमध्येही जाण्यास नकार दिला. ते म्हणाले की, जर ९ कोटी लोकांसाठी बंकर असेल तरच मी त्यात प्रवेश करेन.”

खामेनींना हौतात्म्य पत्करायचे होते

इस्लाम धर्मात हौतात्म्य पत्करण्याला महत्त्व आहे, हे सांगताना इलाही पुढे म्हणाले की, सध्या पवित्र रमझानचा महिना सुरू आहे. खामेनी यांना फार पूर्वीपासून आपल्या भूमीसाठी हौतात्म्य पत्करायचे होते. असे मरण येणे हा अभिमानाचा क्षण आहे, असे खामेनींना वाटत होते.

“मी आता ८६ वर्षांचा म्हातारा झालो आहे. मला भीती वाटते की, मी रुग्णालयात किंवा अपघातामुळे किंवा एखाद्या आजारामुळे मरेन. त्यापेक्षा मी शहीद होणे पसंत करेन”, असे खामेनी काही दिवसांपूर्वी म्हणाल्याचे मला आठवत आहे, असेही इलाही यांनी सांगितले.