Suvendu Adhikari defeats Mamata Banerjee in Bhawanipur: पाच वर्षांपूर्वी भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्याच अधिकारी यांनी आता २०२६ मध्ये पुन्हा तोच विक्रम करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा पराभव केला आहे. नंदीग्राममध्ये पराभव झाल्यानंतर याच भवानीपूर मतदारसंघाच्या मदतीने ममता बॅनर्जी विधानसभेत पोहोचल्या होत्या. मात्र आता त्यांना भवानीपूरही गमवावे लागले आहे.
भवानीपूर मतदारसंघात मतमोजणीच्या २० फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ममता बॅनर्जी या कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रावर पोहोचल्यानंतर काही काळ मतमोजणीत व्यत्यय आला होता. मात्र त्यानंतर मतमोजणी सुरू झाली. सुवेंदू अधिकारी यांना एकूण ७३,९१७ मते मिळाली आहेत. त्यांनी ममता बॅनर्जी यांचा तब्बल १५,१०५ मतांनी पराभव केला आहे. ममता बॅनर्जी यांना ५८,८१२ मते मिळाली.
सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे.
सुवेंदू अधिकारी हे एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सहकारी होते. २०११ साली त्यांनी तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. मात्र पुढील काळात ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भवानीपूर मतदारसंघात निकालाच्या दिवशी प्रत्येक फेरीनंतर मतांची आकडेवारी बदलत होती. कधी ममता बॅनर्जी आघाडी घेत होत्या, तर त्या पिछाडीवर जात होत्या. अखेर त्यांना हार स्वीकारावी लागली.
भवानीपूरमध्ये त्यांचा पराभव का झाला? हे काही कारणे…

भाजपाने जखमेवर मीठ चोळले
पश्चिम बंगालमध्ये सलग चौथ्यांदा सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तृणमूल काँग्रेसचा भाजपाने अक्षरश: सुपडा साफ केला. २९३ जागांपैकी १९८ जागांवर भाजपाने विजय मिळवला असून ९ जागांवर अजूनही ते आघाडीवर आहेत. याचा अर्थ भाजपाला २०० हून अधिक जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने ६९ जागांवर विजय मिळवला असून ११ जागांवर ते आघाडीवर आहेत.
ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील कालीघाट परिसरात राहतात. याच भागातून त्यांनी युवक काँग्रेसचे काम सुरू केले होते. धडाडीच्या युवा नेत्या म्हणून ज्या भागातून कामाला सुरुवात केली, तिथेच आज त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यामुळे भाजपाने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
पराभवाची संभाव्य कारणे काय?
आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार-हत्या प्रकरणामुळे महिला सुरक्षेच्या बाबतीत ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे राजकीय जाणकार सांगतात. मात्र भवानीपूर मतदारसंघातील पराभवामागे इतर अनेक कारणे असल्याचे म्हटले जाते.
एसआयआर प्रक्रिया, मतदारांची पुनर्पडताळणी यामुळे भवानीपूर विधानसभेतील लोकसंख्याशास्त्रीय रचना बदलली असल्याचे सांगितले जाते. दक्षिण कोलकातामधील हा मतदारसंघ छोटा भारत समजला जातो. यात सर्व भारतीयांचा संमिश्र गट आहे. मतदारसंघात अंदाजे ४२ टक्के बंगाली हिंदू आहेत. ३४ टक्के बिगर बंगाली हिंदू आहेत. तर एक चतुर्थांश मुस्लिम मतदार आहेत. बिहार, ओडिशा आणि झारखंडमधील स्थलांतरितांचेही प्रमाण लक्षणीय आहे.
यावेळी भाजपाला बिगर बंगाली हिंदू व्यापारी समाजातील (गुजराती, मारवाडी) गटांनी तर पाठिंबा दिलाच, त्याशिवाय बंगाली हिंदूंनीही सुवेंदू अधिकारी यांच्या पारड्यात आपली मते टाकली.
कोलकातामधील टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, शहरी मध्यमवर्गीयांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कारभाराबद्दल नाराजी निर्माण झाली होती. इमारतींमधील रहिवाशांचे वाढते प्रमाण आणि बिगर बंगाली मतदारांमुळे ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यामध्ये घट होत गेली.
त्यानंतर निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन हे वादग्रस्त ठरले. भवानीपूर मतदारसंघातून ४७,००० ते ५१,००० नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे सांगितले गेले. यात विशेष करून मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा असल्याचे मानले जातो, जो टीएमसीचा मुख्य आधार होता.
अल्पसंख्याक, स्थलांतरित आणि शहरातील गरीब मतदारांना जाणूनबुजून मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा आरोप टीएमसीने केला. तर निवडणूक आयोगाने हा आरोप फेटाळून लावत दुबार आणि अपात्र नोंदी काढून टाकण्यासाठी एसआयआर आणल्याचे म्हटले.
भवानीपूर चक्रव्यूह ठरला
भाजपाने सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी देऊन भवानीपूरमधील लढत प्रतिष्ठेची केली होती. अनेक महिन्यांपासून भाजपाने भवानीपूर मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी रणनीती आखली. भाजपाची मते वाढविण्यासाठी बंगाली हिंदू आणि हिंदी भाषिक व्यापारी गटांना लक्ष्य केले.
तसेच सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी देऊन भाजपाने तुल्यबळ आव्हान उभे केले. सुवेंदू अधिकारी यापूर्वी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केलेला होता. अधिकारी यांनी यावेळी तीन स्तरावर आपली रणनीती आखली. बूथ स्तरावरील सामाजिक गणिताची जुळवाजुळव, बिगर मुस्लिम मतांना एकत्र करणे आणि स्वतःची उमेदवारी लोकांपर्यंत पोहोचवणे. या तीनही स्तरावर अधिकारी यांनी व्यूहरचना आखली.
अधिकारी प्रतिस्पर्धी असल्यामुळे ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातच घेरल्या गेल्या. त्यांच्यासाठी याठिकाणी चक्रव्यूहाप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली.
