बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंतरात्म्याचा आवाज ऐकून राजीनामा देत असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले होते. यावरुन नितीश कुमार यांचा अंतरात्मा पंतप्रधान मोदी आहेत का, असा सवाल तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे. नितीश कुमार यांचा अंतरात्मा म्हणजे नेमके कोण, असे म्हणत पनामा पेपर्स प्रकरणात नितीश यांचा अंतरात्मा का जागा होत नाही, असादेखील प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना विचारला.

‘महाआघाडी तोडण्यासाठीच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. भ्रष्टाचार प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. यानंतर याच मुद्याचा वापर करत नितीश कुमार महाआघाडीतून बाहेर पडले,’ असे आरोप माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला. महाआघाडीतून बाहेर पडताना आणि बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना नितीश कुमार यांनी अंतरात्म्याचा उल्लेख केला होता. ‘अंतरात्म्याचा आवाज ऐकून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहे,’ असे त्यावेळी नितीश कुमार यांनी म्हटले. यावरुवही तेजस्वी यादव यांनी नितीश यांच्यावर निशाणा साधला. ‘नितीश यांचा अंतरात्मा कोण आहे? खुर्ची त्यांचा अंतरात्मा आहे का? मनातील भीती, लोभ त्यांचा अंतरात्मा आहे का? की पंतप्रधान मोदीच त्यांचा अंतरात्मा आहेत?,’ अशा शब्दांमध्ये तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांची खिल्ली उडवली.

तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. याच आरोपांमुळे राजीनामा देत असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले होते. मात्र आता नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्याने स्थापन केलेल्या मंत्रिमंडळातील २७ पैकी २२ मंत्र्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. यावरुनही तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना लक्ष्य केले. ‘संयुक्त जनता दल आणि भाजपच्या सरकारमधील ७५ टक्के मंत्र्यावर गुन्हे दाखल आहेत. मग नितीश कुमार कोणत्या नैतिकतेच्या गप्पा मारतात?,’ असा सवाल तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला.

पनामा पेपरर्सवरुनदेखील तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘पनामा पेपर्समध्ये ज्यांचे नाव आहे, त्यांची चौकशी करण्याची मागणी नितीश कुमार पंतप्रधान मोदींकडे करणार का?,’ असा प्रश्न तेजस्वी यादव यांनी विचारला. ‘पनामा पेपर्समध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांचे नाव आहे. आता नितीश कुमार यांचा अंतरात्मा कुठे गेला? या प्रकरणात त्यांचा अंतरात्मा काही बोलणार का?,’ अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी पत्रकार परिषदेत केली. नितीश कुमार यांचा अंतरात्मा सोयीनुसार जागा होतो, असा टोलादेखील त्यांनी लगावला.