राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणामुळे मागील वर्षी जून महिन्यात संपूर्ण देश हादरला होता. इंदूरमध्ये वास्तव्यास असलेला राजा आणि त्याची पत्नी सोनम असे दोघंही मधुचंद्रासाठी शिलाँगला गेले होते. तिथून आधी हे दोघं बेपत्ता झाल्याची बातमी आली. त्यानंतर जून महिन्यात राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला आणि नंतर समोर आली त्यामागची क्रूर बातमी. राजाची पत्नी सोनमनेच राजाची हत्या घडवून आणल्याचं समोर आलं. या प्रकरणी सोनमला अटकही झाली होती. पण २८ एप्रिलला (मंगळवार) तिला जामीन मंजूर करण्यात आला. ज्यानंतर आता राजाच्या कुटुंबाने नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

राजा रघुवंशीचे आई वडील काय म्हणाले?

सगळ्यांना ठाऊक आहे की राजाची हत्या सोनमने घडवून आणली. तिला अटकही करण्यात आली होती. मग तिला जामीन कसा मिळाला? शिलाँग न्यायालयाने तिला जामीन कसा काय मंजूर केला? आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. पण तिला जामीन कसा दिला? तिला फाशीची शिक्षा का नाही सुनावली गेली? असे प्रश्न मृत राजा रघुवंशीचे वडील अशोक रघुवंशी यांनी विचारले आहेत.

Sonam Raghuvanshi News
सोनम रघुवंशीला जामीन कसा मिळाला? राजाच्या कुटुंबीयांचा सवाल. (फोटो-लोकसत्ता ऑनलाइन)

सोनमला जामीन मिळालाच कसा? उमा रघुवंशींचा सवाल

राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी म्हणाल्या, सोनमला जामीन मिळालाच कसा? सोनमने माझ्या मुलाची हत्या घडवून आणली. तिने सांगितल्यानंतर आणि तिच्या इशाऱ्यानंतरच राजाची हत्या करण्यात आली. मग सोनमला जामीन कसा मिळाला? न्यायव्यवस्थेने आमची साथ दिली नाही का? की पोलिसांनी आमची साथ दिली नाही? हे प्रश्न आमच्या मनात आहेत. सोनमला जामीन कसा काय मिळतो? हा प्रश्न आमच्या मनात आहे असंही उमा रघुवंशींनी म्हटलं आहे.

सचिन रघुवंशींनी काय म्हटलं आहे?

सोनमने हे दाखवून दिलं की कुणाची हत्या करायची असेल तर शिलाँगला जा. त्याला ठार करा आणि त्यानंतर दहा महिने तुरुंगवास भोगला की जामिनावर सुटून या. आता काय दुसरा खून होईपर्यंत वाट बघायची आहे का? कायदा आंधळा असतो असं आम्ही ऐकलं होतं. आता त्याची प्रचितीही आली आहे कारण न्यायदेवता खरंच आंधळी आहे हेच यातून दिसून येतं आहे असं सचिन रघुवंशी यांनी म्हटलं आहे. सोनमला तुरुंगातच डांबलं पाहिजे, तीच तिची योग्य जागा आहे. आम्हाला न्याय कसा मिळणार? असा प्रश्न सचिन रघुवंशी यांनी विचारला आहे.

२३ मे २०२५ च्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

२३ मे २०२५ रोजी राजा आणि सोनम हे दोघंही शिपारा होम स्टे या ठिकाणी आले. पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी या दोघांनी चेक इन केलं. त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास राजा आणि सोनम हे दोघंही ट्रेकला जाण्यासाठी तयार झाले. याचवेळी सोनमने ज्या तिघांना राजाच्या हत्येची सुपारी दिली होती ते तिघेही जवळच्या एका होम स्टेमध्ये राहिले होते. साधारण १० वाजण्याच्या सुमारास सोनम आणि राजाने ट्रेक करत असताना २ हजार पायऱ्यांचं अंतर पार केलं. त्याआधी त्यांची भेट आनंद, आकाश आणि विशाल यांच्याशी झाली होती. साधारण १० वाजण्याच्या सुमारास राजा, सोनम, आकाश, विशाल आणि आनंद या पाचही जणांना अल्बर्ट या टुरिस्ट गाईडने पाहिलं होतं. अल्बर्टने दिलेल्या जबाबामुळेच सोनमच यामागे असावी हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपासाची चक्रं फिरवली. या टुरिस्ट गाईडने दिलेल्या माहितीनुसार सोनम या चार जणांच्या मागून चालत होती तर तिच्या चालण्याचा वेग थोडा मंदावला होता. त्यानंतर एका निर्जन स्थळी गेल्यावर तिने सोबत आलेल्या तिघांना इशारा केला. त्यांनी राजावर दावू या हत्याराने वार केले आणि त्याला ठार केलं. त्यानंतर त्याचा मृतदेह दरीत ढकलला.

सोनमने राजाला मारण्याआधी केला होता राजाच्या आईला फोन

२३ मे २०२५ च्या दुपारी १२.३० च्या दरम्यान सोनमने राजाची आई उमा रघुवंशी यांना फोन केला. मी खूपच दमले आहे आणि उपास ठेवला आहे असं तिने सासूला म्हणजेच राजाच्या आईला सांगिलं. त्यावेळी उमा रघुवंशी राजाशीही बोलल्या. राजाशी हा आपला शेवटचा संवाद आहे हे तेव्हा त्यांना मुळीच वाटलं नव्हतं. साधारण आणखी अर्ध्या तासाने दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हे पाचही जण मावलखियाट या ठिकाणाहून वेई सावदोंग धबधब्याच्या दिशेने निघाला. त्यावेळी सोनलने या तिघांना इशारा केला ज्यानंतर राजाच्या डोक्यावर चाकू हल्ला करण्यात आला. राजाची हत्या करण्यात आली तेव्हा सोनम तिथेच उपस्थित होती. राजाच्या हत्येनंतर सोनमने राजाच्या मोबाइलवरुन सात जन्मो का साथ असं लिहून एक सोशल मीडिया पोस्ट केली. दुपारी २.३० च्या दरम्यान राजाचा मृतदेह दरीत फेकण्यात आला. असा घटनाक्रम राजाच्या मृत्यू आधी घडला होता.

राजा रघुवंशीच्या हत्येचा घटनाक्रम कसा होता? विशेष तपास पथकाने दिलेली माहिती काय होती?

आकाश, आनंद आणि विकास हे इंदूरहून शिलाँग येथे गेले. उघड होऊ नये यासाठी त्यांनी वेगवेगळी वाहने वापरली.

२३ मे रोजी सोनम आणि राजा हे चेरापुंजी येथे ट्रेकसाठी बाहेर पडले, त्यांच्याबरोबर तीन आरोपी देखील होते.

या सगळ्यांनी डबल-डेकर लिव्हिंग रूट ब्रीजकडे जाण्यासाठी पर्यटक वापरतात तो रस्ता सोडला आणि कमी माहिती असलेला आणि ओबडधोबड वाट निवडली.

स्थानिक गाईड अल्बर्ट पडे (Albert Pde) याने त्यांना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पाहिले, ते सर्व जण हिंदीत बोलत होते आणि त्यांनी आम्हाला गाईड नको असे त्याला सांगितले.

निर्जन स्थळी पोहचल्यावर सोनम थोडी मागे राहिली आणि त्याला ठार करा असे ओरडली, यानंतर विकी ठाकूर याने राजा याच्यावर पहिला वार केला.

त्यानंतर इतर दोन आरोपी सहभागी झाले आणि त्यांनी राजा याच्या डोक्यावर आणि अंगावर धारदार शस्त्राने वार केले.

राजा रघुवंशीचा मृतदेह ढकलून नेऊन तो दरीत ढकलण्यात आला, मिळालेल्या माहितीनुसार सोनम हे सर्व करवून घेत होती. तिच्या प्रियकराला अटक झाल्यानंतर सोनम ८ जूनला शरण आली होती. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. आता तिला जामीन मिळाला आहे.