नोएडामध्ये हजारो कामगार रस्त्यावर उतरत आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. नोएडा फेज २ मध्ये झालेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. संतप्त कामगारांनी दगडफेक, तोडफोड केली, काही ठिकाणी तर जाळपोळीच्याही घटना घडल्या. नोएडा प्रमाणेच देशातील इतर भागातही कामगार विविध कारणांसाठी रस्त्यावर उतरल्याच्या घटना घडल्या आहेत. नोएडामधील काही कामगारांशी द इंडियन एक्सप्रेसने संवाद साधला असून त्यांनी आंदोलनाची वेळ का आली? याची कारणे सांगितली आहेत.
तुटपुंजे वेतन मिळत असल्यामुळे त्यात दैनंदिन गुजराण करणे अवघड झाले आहे, अशी साधारण सर्वच कामगारांची तक्रार आहे. आखाती देशात संघर्ष सुरू झाल्यानंतर एलपीजी गॅस सिलिंडरचा काळा बाजार सुरू झाला. ज्यामुळे सिलिंडराचे दर भडकले, कामाच्या ठिकाणी अवास्तव टार्गेट आणि पीएफ तसेच इतर सुविधांची वाणवा असल्याचीही कामगारांची तक्रार आहे.
तुटपुंजी वेतनवाढ आणि अतिरिक्त कामाचा तणाव
द इंडियन एक्सप्रेसने संवाद साधलेले सर्व चार कामगार कंत्राटी स्वरुपात काम करतात. सुरेंद्र कश्यप नावाचा १८ वर्षीय कामगार उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातून आला आहे. कश्यप म्हणाला, “हरियाणातील मानेसर येथील कामगारांना आठ तासांच्या शिफ्टसाठी २० हजार रुपयांचे वेतन मिळते. मग आम्हाला वेतनवाढ का दिली जात नाही? मला १३ हजार रुपये वेतन आहे, त्यात ४ हजार रुपये भाड्यात जातात. एक किलो गॅससाठी ४०० रुपये मोजावे लागत आहेत. एवढ्यात आम्ही कसे भागवायचे?”
माझ्या वेतनात मागच्या वर्षी फक्त ३२० रुपयांची वाढ झाली. आम्हाला रात्रीही काम करण्यास बळजबरी केली जाते. जर आम्ही आजारी आहोत, असे म्हटले तर, तर उद्यापासून येऊ नका, असे उत्तर मिळते. जर रविवारी काम करण्यास नकार दिला, तर कामावरून काढण्याची धमकी दिली जाते.
कश्यप काम करतो त्या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही सरकारने ठरविलेल्या किमान वेतन धोरणाअंतर्गतच पगार देत आहोत. हरियाणा सरकारने वेतनात ३५ टक्क्यांची वाढ केल्यानंतर इथे आंदोलने सुरू झाली आहेत. आम्ही आमच्या कामगारांचा आदर करतो. जर सरकारने निर्णय घेतला तर आम्हालाही वेतनवाढ द्यावी लागेल, पण त्याचा अतिरिक्त बोजाही आम्हाला सहन करावा लागेल.
फक्त ३९ रुपये वेतनवाढ
उत्तर प्रदेशच्या कनौजमधून आलेला राहुल (वय २५) कापड कारखान्यात काम करतो. २०१८ पासून या कारखान्यात काम करणाऱ्या राहुलचे लग्न झाले असून त्याला ३ आणि १ वर्षांची मुले आहेत. राहुल म्हणाला, माझे वेतन केवळ १३,५०० रुपये आहे. माझ्याकडे महिन्याकाठी काहीच उरत नाही. त्यामुळे मला पैसे पाठवता येत नाहीत. माझ्या खोलीचे भाडे ५,००० रुपये आहे, तर ४,००० रुपये रेशनवर खर्च होतात. एवढ्याश्या पगारात घर तरी कसे चालवायचे? माझ्या मुलांना मी शिक्षण तरी कसे देणार?
मागच्या वर्षी माझ्या वेतनात फक्त ३९ रुपयांची वाढ करण्यात आली. कंपनीच्या एचआर आमचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाहीत, अशी खंतही राहुलने व्यक्त केली.

एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ५,०००
कापडावर कारागिरी करणाऱ्या मोहम्मद नूर आलम (२८) यानेही अशाच प्रकारचा अनुभव कथन केला. मुळचा सीतामढी, बिहारचा असलेल्या आलमने म्हटले की, मला २० हजार रुपये वेतन आहे. यातून माझ्या हातात काहीच उरत नाही. मी माझ्या आईला पैसे पाठवू शकत नाही. काळ्या बाजारात गॅस सिलिंडरचा भाव ५,००० रुपयांपर्यंत गेला आहे. युद्धामुळे एलपीजी गॅसचा दर वाढला, हे समजू शकतो. पण इतर वाढलेल्या खर्चांचे आणि महागाईचे काय?
महागाईमुळे लोकांना उपाशी झोपावे लागत आहे. जर जीवनावश्यक वस्तूंचा दर १०० रुपये होत असेल तर वेतन १२० रुपयांनी वाढवले पाहिजे. पण असे का होत नाही? असा प्रश्न आलमने उपस्थित केला.
बिहारच्या छपरामधून आलेल्या बबिता देवी (३०) यांनीही महिला कामगारांना काय भोगावे लागते, याचा पाढा वाचला. बबिता पोलिओग्रस्त आहेत. तिच्या मुलाला पोलिसांनी आंदोलनादरम्यान अटक केली. माझ्या मुलाला सोडून द्या, यासाठी पोलिसांकडे विनवणी करत होते, असे रडत रडत बबिता यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, मला सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत काम करण्याचे ८,००० रुपये मिळतात. जर ओव्हरटाईम केला तर १० हजारांपर्यंत वेतन मिळते. आम्हाला सहा मुले असून कुटुंबात खाणारी तोंडे ८ आहेत. आमच्या खोलीचे भाडेच १२,००० हजार आहे. अशात आम्ही जगायचे तरी कसे?

आणखी कोणत्या शहरांमध्ये आंदोलने?
फक्त नोएडाच नाही तर बिहारच्या बरौनी, गुजरातमधील सूरत आणि हरियाणाच्या पानिपत आणि मानेसर येथे कामगारांची वेतनवाढी आंदोलने झाली आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये नवी कामगार संहिता लागू झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे वेतनवाढ न झाल्यामुळे कामगार नाराज आहेत. त्यातच पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅस सिलिंडरचा काळा बाजार सुरू झाल्यामुळे स्थलांतरित कामगार मोठ्या संकटाचा सामना करत आहेत.
२ फेब्रुवारी रोजी बिहारमध्ये पहिले कामगार आंदोलन झाले. किमान वेतन आणि दिवसाला आठ तासांची शिफ्ट, तसेच पीएफ आणि ईएसआयसी सारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा, अशी कामगारांची मागणी होती. अशाचप्रकारे २३ फेब्रुवारी रोजी पानिपतमधील तेलशुद्धीकरण कारखान्यात ३० हजार कंत्राटी कामगारांची आंदोलन केले.
२७ फेब्रुवारी रोजी सूरतमधील लार्सन अँड टुब्रोच्या ५,००० कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर काही गाड्या पेटवण्यात आल्या. तसेच आंदोलन थांबवताना पोलीसही जखमी झाले.
पाकिस्तान संबंधाचा आरोप काय?
जवळपास ४० हजार कामगार आंदोलनात उतरले असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी यात बाहेरच्या लोकांचा सहभाग असल्याचा आरोप करत मोठ्या कटाची शक्यता वर्तवली आहे. पाकिस्तानच्या पाठिंब्यावर अस्थिरतेचे प्रयत्न आणि नक्षलवादाला पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत.
उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांनी आंदोलनामागे सुनियोजित कट असल्याचे म्हटले. तसेच मेरठ आणि नोएडा येथे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानशी संबंधित लोकांना अटक केल्याचा हवाला राजभर यांनी दिला.
