सर्वोच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांच्या पीठाच्या समोर शबरीमला मंदिर प्रकरणात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला. हा प्रश्न होता तो म्हणजे अनुच्छेद २५ आणि २६ मध्ये दिलेल्या नैतिकता या शब्दाची व्याख्या कशी केली जावी? धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर एका सीमित मर्यादेपर्यंत हा शब्द लागू होतो असंही मत मांडलं गेलं. तसंच यावेळी सर्वोच्च न्यायालयाने इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन द्वारे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर प्रश्न उपस्थित केले. ही कुठली संघटना आहे? त्यांची याचिका सुरुवातीलाच फेटाळून टाकायला हवी होती.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटलं आहे की PIL चा अर्थ आता पब्लिसिटी इंटरेस्ट, प्रायव्हेट इंटरेस्ट, पैशांचा इंटरेस्ट आणि पॉलिटिकल इंटरेस्ट लिटिगेशन असा झाला आहे. तसंच यंग इंडियन लॉयर्स असोसिएशनला खडे बोल सुनावले आहेत, तुमच्याकडे आणखी काही काम नाही का? असाही तिखट प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. या संघटनेला नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा प्रश्न विचारला आहे की धार्मिक मुद्दा उपस्थित करुन तुम्ही याचिका का दाखल केली? तसंच तुमच्या संघटनेने हिंदू मंदिराशी संबंधित याचिका कशी काय दाखल केली? यावर असोसिएशनच्या वकिलाने सांगितलं की ही याचिका संघटनेतील महिला सदस्यांनी दाखल केली आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत काय म्हणाले?
शबरीमला मंदिराबाबत इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनने दाखल केलेली याचिका कचराकुंडीत फेकून द्यायला हवी होती. या सुनावणीत ही याचिका सुनावणीला कशासाठी घेतली? तुम्ही एखाद्या पुजाऱ्याच्या वतीने ही याचिका दाखल केली असेल तर तुम्हाला ही याचिका दाखल करण्याचा अधिकार कसा काय मिळाला?
न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना काय म्हणाल्या?
जस्टीस बी.व्ही नागरत्ना म्हणाल्या आजकाल बातम्या छापून आणणं फार सोपं झालं आहे. सरन्यायाधीश महोदयांना रोज हजारो पत्रं मिळतात. त्या सगळ्याचं रुपांतर याचिकांमध्ये करायचं आहे का? PIL चा अर्थ आता PIL चा अर्थ आता पब्लिसिटी इंटरेस्ट, प्रायव्हेट इंटरेस्ट, पैशांचा इंटरेस्ट आणि पॉलिटिकल इंटरेस्ट लिटिगेशन असा झाला आहे.

असोसिएशनचे वकील काय म्हणाले?
यानंतर असोसिएशनचे वकील म्हणाले की कुठलीही याचिका ही व्यक्तिगत हितासाठी नको. कोर्टाने जर याचिकेची दखल घेतली तर तो फक्त याचिकेपुरता मर्यादित विषय राहात नाही. संविधानिक नैतिकता हा असा एक सिद्धांत आहे जो व्यक्ती परत्वे बदलू शकतो. असोसिएशनच्या वकिलांनी असंही सांगितलं की सदर याचिका ही महिला वकिलांनी दिली आहे. कारण अयप्पा मंदिराशी जो मुद्दा जोडला गेला आहे त्याबाबत त्या चिंतित होती. त्या ठिकाणी एक पूजारी आपत्तीजनक स्थितीत सापडला. अशा माणसाला मंदिराने कसं काय नियुक्त केलं आणि तो असा असेल तर त्याला ठेवलं का?
सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काय म्हटलंय?
असोसिएशनचं म्हणणं ऐकल्यावर जस्टिस नागरत्ना म्हणाल्या की तुम्हाला या सगळ्याशी घेणंदेणं काय? तुम्ही कोण आहात? तर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की तुम्ही देशाचे मुख्य पुजारी आहात का? मी पुन्हा विचारतो वकिलांची एक संघटना आहे ती धार्मिक मुद्द्याशी स्वतःला का संलग्न करु पाहते आहे? तसंच जस्टिस नागरत्ना या पुढे म्हणाल्या यंग लॉयर्स असोसिएशनकडे दुसरं काही काम उरलेलं नाही का? बार असोसिएशनच्या कल्याणाचं काम ते करु शकत नाहीत का? किंवा त्यांना त्या कामात मदत करु शकत नाहीत का? जे वकील ग्रामीण भागातून शहरांमध्ये येतात, संघर्ष करतात त्यांना मदत करा. अशा प्रकारच्या याचिका करण्यापेक्षा समाजाला उपयोगी पडतील अशा गोष्टी करा.

७ एप्रिल रोजी तुषार मेहतांनी कुठले मुद्दे मांडले होते?
२०१८ मध्ये जो निर्णय दिला गेला त्यात तीन महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित करण्यात आले.
संविधान सभा मधील प्रतिवाद अनुच्छेद २५ आणि २६ च्या समावेशाचा आधार झाला.
भारतात धर्म व्यापक प्रमाणावर आहेत, त्यांच्यात वैविध्य आहे. हा प्रश्न फक्त एका धर्मापुरता मर्यादित नाही.
धर्मांमध्ये असलेलं अंतर्गत वैविध्य न्यायालयाने मान्य केलं नाही. भारतात असलेलं हे धार्मिक वैविध्य गौरवशाली आहे. धर्म हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो किंवा इतर.
रामायण-महाभारताचा उल्लेख करत काय म्हणाले होते तुषार मेहता?
तुषार मेहतांनी आपला युक्तिवाद करताना महाभारत, रामायण आणि प्राचीन वेदांचा हवाला दिला होता. हिंदू धर्माचं सौंदर्य हे आहे की तुम्ही आज्ञाधारक हिंदू होऊ शकता. सनातन धर्म किंवा हिंदू धर्म असं व्यापक स्तरावर ज्या धर्माला म्हटलं जातं त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आपल्याकडे चार वेद आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. माणसाने आयुष्य कसं जगलं पाहिजे ते या वेदांमध्ये निर्धारित केलं गेलं आहे. आपल्याकडे चार उपवेद आहेत द्याच धनुर्वेद, गंधर्ववेद, आयुर्वेद आणि अर्थशास्त्र यांचा सहभाग आहे. आपल्या धर्मांत १८ महापुराणं आहेत, १८ उपपुराणंही आहेत. तसंच रामायण आणि महाभारत यांच्यासारखी महाकाव्यंही आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं.
