scorecardresearch

…म्हणून राहुल गांधींनी कडाक्याच्या थंडीतही केवळ टी-शर्ट घातला, भारत जोडो यात्रेदरम्यानचा सांगितला ‘तो’ प्रसंग

राहुल गांधींनी संपूर्ण पदयात्रेत केवळ टी-शर्टच का परिधान केला? कडाक्याची थंडी असतानाही त्यांनी स्वेटर किंवा जॅकेट का परिधान केला नाही? याचं कारण त्यांनी सांगितलं आहे.

rahul gandhi (3)
संग्रहित फोटो- इंडियन एक्स्प्रेस

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज काश्मीरमध्ये समारोप होत आहे. समारोपाच्या कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. यावेळी केलेल्या भाषणातून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान आलेले विविध अनुभव लोकांना सांगितले आहेत. यावेळी त्यांनी संपूर्ण पदयात्रेत केवळ टी-शर्टच का परिधान केला? कडाक्याची थंडी असतानाही त्यांनी स्वेटर किंवा जॅकेट का परिधान केला नाही? याचं कारण राहुल गांधींनी सांगितलं.

भारत जोडो पदयात्रेत चालत असताना घडलेला एक प्रसंगही त्यांनी यावेळी सांगितला. संबंधित प्रसंग सांगताना राहुल गांधी म्हणाले, “मी पदयात्रेत चालत असताना थंडी वाढत होती. सकाळची वेळ होती. त्यावेळी चार लहान मुलं माझ्याकडे आली. ही बाब मी सांगायला हवी की नाही, हे माहीत नाही. पण आता सांगतो. ती लहान मुलं भिकारी होते. भीक मागत होते. ते जेव्हा माझ्याजवळ आले, तेव्हा त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. कदाचित ते मजुरी करत असतील. म्हणून त्यांच्या अंगाला मातीही लागली होती.”

हेही वाचा- “माझा पांढरा टीशर्ट लाल करण्याची संधी मी..” राहुल गांधी यांचं रोखठोक वक्तव्य

“ते जेव्हा माझ्याजवळ आले, तेव्हा मी त्यांची गळाभेट घेतली. त्यांच्या समांतर येता यावं, म्हणून मी गुडघ्यावर बसून त्यांना मिठी मारली. तेव्हा मला जाणवलं, त्यांना थंडी वाजत होती. कदाचित त्यांना जेवण मिळालं नसावं. त्यावर मी विचार केला की, ही मुलं स्वेटर किंवा जॅकेट परिधान करत नसतील, तर मलाही जॅकेट किंवा स्वेटर परिधान केला नाही पाहिजे,” असं कारण राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा- भर बर्फवृष्टीत प्रियांका गांधी यांचे जोरदार भाषण; म्हणाल्या, “भारत जोडो यात्रेने देशाला…”

खरं तर, भारत जोडो यात्रा दिल्लीतून उत्तरेकडे प्रवास करत असताना कडाक्याची थंडी पडली होती. सर्वत्र थंडीची लाट होती. तापमानाचा पारा घसरला होता. पदयात्रेतील अनेकजण स्वेटर किंवा जॅकेट परिधान करून मार्गक्रमण करत होती. राहुल गांधी यांनी केवळ टी-शर्ट घातला होता. यावरून राजकारणही करण्यात येत होतं. राहुल गांधींनी टी-शर्टच्या आतून गरम कपडे घातले होते, असा दावा भाजपाच्या काही नेत्यांकडून करण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 14:25 IST
ताज्या बातम्या