‘झेड’ सुरक्षा पुरवण्याच्या निर्णयावर टीकेचा सूर
अग्रलेख : यांच्याही जिवास  धोका आहे..!
रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा पुरवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सोमवारी चहुबाजूंनी टीकेचा सूर उमटला. देशात महिलांवर दिवसाढवळय़ा अत्याचार होत असताना अंबानींची एवढी बडदास्त कशासाठी, असा सवाल डाव्या पक्षांनी केला. या मुद्यावर वातावरण तापू लागताच अंबानी हे या सुरक्षेचा खर्च स्वत: उचलणार आहेत, अशी सारवासारव केंद्र सरकारने केली.
देशात चार-पाच वर्षांच्या बालिकांवर दिवसाढवळ्या बलात्कार होतात. अशी भीषण परिस्थिती असताना रिलायन्स उद्योसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना झेड दर्जाची सुरक्षा देणे तसेच त्यांच्या सुरेक्षासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांची नियुक्ती करणे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते वासुदेव आचार्य यांनी व्यक्त केली.  
हे प्रकरण अंगाशी शेकत असल्याचे दिसल्यानंतर केंद्र सरकारने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. अंबानी हे त्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेचा खर्च देणार आहेत. तसेच सीआरपीएफच्या जवानांना तेच छावणी उपलब्ध करून देतील, अशी माहिती केंद्रीय सूत्रांनी दिले. महाराष्ट्र सरकारने मात्र केंद्राच्या निर्णयाचे समर्थन केले. राज्यात गुंतवणुकीसाठी उद्योजकांत आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी अशी सुरक्षा पुरवणे आवश्यक असल्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील म्हणाले.