Spain Migrant Crisis Ceuta Morocco Border: मोरक्कोमधून हजारो स्थलांतरितांनी गुरुवारी स्पेनच्या उत्तर आफ्रिकेतील सेउटा या प्रदेशात प्रवेश केला. यामुळे स्पेनला आता सीमेवर सैन्य तैनात करावे लागले आहे, ज्यामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. २०२१ नंतर स्पेन सर्वात मोठे स्थलांतरितांचे संकट झेलत आहे. स्पेनच्या गृह मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, गेल्या २४ तासांत मोरोक्कोमधून समुद्र आणि जमिनीमार्गे सुमारे ४९,००० स्थलांतरितांनी सेउटा क्षेत्रात प्रवेश केला.
स्थलांतरित सीमा का ओलांडत आहेत?
जगण्याच्या चांगल्या संधी, आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि स्वतःच्या देशातील अनिश्चित परिस्थितीतून सुटका व्हावी, यासाठी अनेकजण स्पेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. युरोपमध्ये प्रवेशाचा मार्ग स्पेनमधून जातो. उत्तर आफ्रिकेतील सेउटा आणि मेलिला हे दोन शहरे युरोपियन युनियन आणि आफ्रिकेशी जोडलेली आहेत. ज्यांना युरोपमध्ये शिरायचे आहे, त्यांच्यासाठी ही दोन शहरे महत्त्वाची ठरतात.
अनेक स्थलांतरित मोरोक्कोच्या फ्निदेक किंवा बेल्योनेच या शहरांमधून पोहत पोहत सेउटामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. तर काही जण जमिनीवरील सीमा ओलांडण्याची जोखीम पत्करतात. स्पॅनिश अधिकारी हे अनेकांना पुन्हा हद्दपार करत असले तरी काहींना निर्वासितांच्या शिबिरात वास्तव्य करण्याची परवानगी देतात, तर काहींना स्पेनमध्ये आश्रय घेण्यासाठी अर्ज करण्याची मुभा दिली जाते.
Shocking images of massive and uncontrolled arrivals of illegal migrants at the Spanish border today.
— EPP Group (@EPPGroup) July 30, 2026
Uncontrolled borders demand immediate action. The EU Migration Pact and the Return Regulation can’t wait.
We urge Spain to act NOW to secure our external borders and the… pic.twitter.com/dyhwkj5H84
स्पेनमधील ५ लाख अवैध स्थलांतरितांना सामावून घेण्याच्या निर्णयामुळे स्थलांतरितांची ही नवी भर पडल्याचे स्पॅनिश अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले. समुद्रमार्गे आलेल्या स्थलांतरितांना पुन्हा मोरोक्कोत हद्दपार करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंध घातल्याचा हा परिणाम असू शकतो, असे स्पेन सरकारने म्हटले. या निर्णयामुळे मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतरितांना समुद्रामार्गे स्पेनमध्ये धाडले असावे, असा अंदाज स्पेन सरकारच्या प्रवक्त्याने रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केला.
गुरुवारी सेउटामध्ये काय झाले?
सेउटाच्या ताराजल समुद्रकिनाऱ्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात असंख्य स्थलांतरित समुद्रामार्गे आलेले दिसत आहेत. ते लाटा रोखणारी भिंत ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यात बहुसंख्य पुरुषांचा समावेश असला तरी काही महिला आणि कुटुंबेही दिसत आहेत. यातील काही जण व्हिवा एस्पान्या आणि स्पेनचा विजय असो, अशा घोषणा देताना दिसत आहेत.
स्थलांतरित जादिद झकारियाने सेउटामध्ये ओल्या चिंब अवस्थेत पोहोचल्यानंतर रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, पोलिसांनी आम्हाला रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र आमची इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयामुळे आम्ही इथे पोहचू शकलो.
