पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना आलेल्या अपयशानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनेक नेत्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचे राजीनामे दिले आहेत. यातच तृणमूल काँग्रेस पक्षात फूट पडली असल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

या घडामोडी सुरू असताना फिरहाद हकीम यांनी कोलकाता महापालिकेच्या महापौरपदाचा ३ जून रोजी राजीनामा दिला. त्यानंतर आज (४ जून) कृष्णा चक्रवर्ती यांनी बिधाननगर महापालिकेच्या महापौरपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांत दोन मोठ्या महापालिकेच्या महापौरांनी राजीनामे दिल्यामुळे ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

वृत्तानुसार, बिधाननगर महानगरपालिकेच्या महापौर कृष्णा चक्रवर्ती यांनी गुरुवारी महापौर पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच कृष्णा चक्रवर्ती यांनी आपल्या राजीनाम्यात राजीनामा देण्यामागचं कारण वैयक्तिक असल्याचा उल्लेख केला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

कृष्णा चक्रवर्ती यांनी काय म्हटलं?

“मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला आहे. यामागे दुसरं काहीही राजकारण नाही. जोपर्यंत मी महापौर होते, तोपर्यंत मी लोकांसाठी काम केलं आहे. आता मी नगरसेविका म्हणून काम करत राहणार आहे. मला अनेक कार्यकर्त्यांकडून फोन येत आहेत. मला बिधाननगरच्या लोकांकडून खूप सपोर्ट मिळाला. मी त्यांची सदैव आभारी राहील. माझ्या मनात कोणाबद्दलही नाराजी नाही”, असं कृष्णा चक्रवर्ती यांनी राजीनामा देताना म्हटलं आहे.

कोलकाता महापालिकेच्या महापौरपदाचा राजीनामा

ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे टीएमसीचे नेते फिरहाद हकीम यांनी कोलकाता महापालिकेच्या महापौरपदाचा ३ जून रोजी राजीनामा राजीनामा दिला. तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम हे २०१८ पासून या पदावर होते.

फिरहाद हकीम यांच्या राजीनाम्याबाबत कुणाल घोष म्हणाले?

टीएमसीचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांनी म्हटलं की, “फिरहाद हकीम यांनी ममता बॅनर्जी यांच्या परवानगीने राजीनामा दिला. फिरहाद हकीम यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे राजीनामा देण्याची विनंती केली होती. कारण राज्य सरकार महापालिका बरखास्त करत असल्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे त्यांना सन्मानपूर्वक निरोप हवा होता. आतापर्यंत ममता बॅनर्जी यांनी परवानगी दिली नव्हती. मात्र, बुधवारी झालेल्या प्रशासकीय बैठकीनंतर हे स्पष्ट झालं की, महापालिका बरखास्त करण्यात येणार असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान व प्रतिष्ठा कायम राहावी यासाठी ममता बॅनर्जी यांनी फिरहाद हकीम यांना राजीनामा देण्याची परवानगी दिली.”

Why tmc mayors resigned updates

फिरहाद हकीम यांना ‘बॉबी’ नावाने ओळखलं जातं. फिरहाद हकीम हे ममता बॅनर्जी यांचे निकटचे सहकारी आहेत. ते कोलकाता येथील पोर्ट विधानसभा मतदारसंघातून तब्बल चार वेळा आमदार राहिलेले आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी टीएमसीच्या बंडखोर गटाचे नेते ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिल्यानंतर आणि तृणमूल पक्षात फूट पडलेली असताना पश्चिम बंगालमधील दोन मोठ्या महापालिकेच्या महापौरांनी राजीनामे दिल्यामुळे टीएमसी पक्षात खळबळ उडाली आहे.