TMC Split : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. ८० आमदारांपैकी जवळपास ५९ आमदार हे ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गेले आहेत. या ५९ बंडखोर आमदारांच्या गटाला विधानसभेत मान्यता देखील मिळाली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आमदार ऋतब्रता बॅनर्जी आणि आमदार संदीपान साहा यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे त्यांच्या गटाला विरोधी पक्षनेते पद मिळावं अशी मागणी केली होती. तसेच ५९ आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र देखील पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांना दिलं होतं. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी या ५९ आमदारांच्या गटाला मान्यता देत आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये फूट का पडली? ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ५९ आमदार कसे गेले? तृणमूल काँग्रेस पक्षात नेमकं काय घडलं? याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. याबाबत आता आमदार संदीपान साहा यांनी खुलासा करत तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडण्याचं कारण काय? नेमकं काय घडलं? यावर सविस्तर भाष्य केलं आहे.

आमदार संदीपान साहा यांनी काय सांगितलं?

तृणमूल काँग्रेसमधील फुटीबाबत बोलताना आमदार संदीपान साहा यांनी सांगितलं की, आता ५९ आमदारांचा गट पश्चिम बंगालच्या विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहे. ऋतब्रता बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली असून हा गट विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करेल”, असं आमदार संदीपान साहा यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

MLA Sandipan Saha revealing secrets of why TMC split

बनावट सहीच्या वादावर संदीपान साहा काय म्हणाले?

तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चा सुरू होताच सर्व आमदारांना एका रजिस्टरवर सह्या करण्यास सांगितलं गेलं होतं, असा दावा संदीपान साहा यांनी केला. मात्र, त्यांच्या मते त्या रजिस्टरवर सह्या नव्हत्या, तर फक्त मोठ्या अक्षरात नावं लिहिलेली होती. नंतर याच दस्तऐवजाचं ‘सर्वसाधारण ठरावात रूपांतर करण्यात आलं आणि टीएमसीचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी तो ठराव विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला. त्यामध्ये सोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि फिरहाद हकीम यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, या प्रस्तावाबाबत माहिती समोर आल्यानंतर अनेक आमदारांना असं वाटलं की, नियमांचं पालन झालं नाही. त्यामुळे काही आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार केली आणि तक्रारीनंतर चौकशी सुरू झाली.

संदीपान साहा यांनी असाही दावा केला की, “चौकशीत असं आढळून आलं की ठरावात समाविष्ट असलेली नावं बैठकीला उपस्थित नसलेल्या आमदारांचीही होती. त्यामुळे आम्हाला वाटलं की नियमांचं पालन झालं नाही. त्यामुळे आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली होती. अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले. पण या सर्व गोंधळामुळे आमदारांचा एक गट नाराज झाला आणि आमदारांमध्ये असंतोष वाढत गेला, परिणामी ५८ आमदारांनी ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतला.”

तृणमूलमध्ये बंडखोरीला सुरूवात कशी झाली?

संदीपान साहा यांनी तृणमूल काँग्रेसमधील बंडखोरीला आणखी एक वाद कारणीभूत असल्याचं सांगितलं. संदीपान साहा यांच्या मते जेव्हा ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या घरी झालेल्या एका सभेत आमदारांना अभिषेक बॅनर्जी यांना ‘स्टँडिंग ओव्हेशन’ देण्यास सांगितलं होतं, तेव्हापासून आमदारांमध्ये नाराजी वाढली होती. मला वाटतं की तिथूनच बंडखोरीला सुरूवात झाली आणि मग ती स्वाक्षरीची घटना घडली. अभिषेक बॅनर्जी यांनी वरिष्ठ नेत्यांना डावललं आणि पक्षांतर्गत लोकशाही कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले”, असं संदीपान साहा यांनी म्हटलं.

५९ आमदारांच्या गटाची पुढची भूमिका काय?

तृणमूल काँग्रेसमधील फूट पडलेल्या या ५९ आमदारांच्या गटाच्या पुढच्या भूमिकेबाबत संदीपान साहा यांनी सांगितलं की, “तृणमूल काँग्रेसमध्ये लोकशाहीचा अभाव होता. ज्या उद्देशाने हा पक्ष सुरू झाला, तो उद्देश आता बदलला असल्याचं दिसत आहे. मात्र, अंतर्गत मतभेद असले तरी ५९ आमदारांचा गट विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत राहील. आम्ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत राहू”, असं म्हणत संदीपान साहा यांनी पक्ष बदलण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

५९ आमदारांच्या गटाला मान्यता मिळाल्यानंतर ऋतब्रता बॅनर्जी काय म्हणाले?

ऋतब्रता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी या आपल्या नेत्या आणि मार्गदर्शक असल्याचं म्हटलं. हे बोलताना ऋतब्रता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचे भाचे तथा खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतल्याचंही पाहायला मिळालं. माध्यमांशी संवाद साधताना ऋतब्रता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं की, “मला हे अगदी स्पष्ट आणि निःसंदिग्धपणे सांगायचं की आजही आमच्या नेत्या ममता बॅनर्जी याच आहेत. त्या आमच्या मार्गदर्शक, पालक आणि सल्लागार म्हणून कायम राहाव्यात, अशी आमची मनापासून इच्छा आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवातून पक्षाला मार्ग दाखवावा, जो या पक्षाचा पाया आहे. मात्र, अभिषेक बॅनर्जी यांचा या विधानसभेशी काहीही संबंध राहिलेला नाही”, असं ऋतब्रता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.

MLA Sandipan Saha revealing secrets of why TMC split

ऋतब्रता बॅनर्जी कोण आहेत?

पश्चिम बंगालमधील उलुबेरिया-पूर्वा विधानसभेचे आमदार ऋतब्रता बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते. नुकत्याच लागलेल्या विधानसभेच्या निकालानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. “तृणमूल काँग्रेस पक्षाने आपला पराभव स्वीकारलेला नाही. आम्ही जेव्हा निकालानंतर बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला अभिषेक बॅनर्जी यांच्या कामगिरीसाठी उभं राहून वंदन करण्यास सांगितलं गेलं होतं”, अशी टीका ऋतब्रता बॅनर्जी यांनी केली होती.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षात फूट पाडणारे ऋतब्रता बॅनर्जी यांनी आपल्या विद्यार्थी राजकीय कारकिर्दीची सुरुवात डाव्या विचारसरणीच्या एसएफआय संघटनेतून केली होती. त्यानंतर २०२० मध्ये ते टीएमसीमध्ये सामील झाले होते. तसेच ते टीएमसी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्षही होते. २०१४ मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले होते आणि २०२४ मध्ये ते दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार झाले. आता २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत ते उलुबेरिया पूर्वा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून आमदार झाले आहेत. तसेच आता ऋतब्रता बॅनर्जी हे टीएमसीच्या ५९ बंडखोर आमदारांच्या गटाचं नेतृत्व करत आहेत.