CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतल्या जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन केलं. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. २५ जुलैला जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तेव्हा जल्लोष साजरा करत हे आनंद मागे घेण्यात आलं. त्याआधी दिल्लीतल्या चलो संसद मार्च या मोर्चावर लाठीचार्ज करण्यात आला होता. ज्यानंतर या आंदोलनाची ठिणगी देशभरात पडली. २० जुलैला ही घटना घडली होती. या प्रकरणी साध्या वेशातले पोलीस का होते? या सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर दिल्ली पोलिसांनी उत्तर दिलं आहे.

न्यायालयाने विचारणा केल्यानंतर पोलिसांचं उत्तर काय?

२० जुलैला संसद मार्च काढून जे आंदोलन सीजेपीने केलं त्या आंदोलनात साध्या वेशातले पोलीस का होते असा प्रश्न न्यायालयाने विचारला. त्यावर दिल्ली पोलिसांनी सांगितलं की साध्या वेशातले पोलीस त्या आंदोलनात होते कारण आम्हाला अकारण होणारी गर्दी नियंत्रणात आणायची होती. दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायलयाला हे उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर अनेक आंदोलकांनी आमच्यावरही हल्ला केला. काही पोलीस त्यात जखमीही झाले ज्यानंतर आम्ही लाठीचार्ज केला आणि त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला असंही पोलिसांनी सांगितलं आहे. साध्या वेशातले पोलीस, त्यांना नेमप्लेट नसणं त्यांनी गर्दीवर लाठीचार्ज करणं हे मुद्दे आंदोलनानंतर आंदोलकांनी आणि विरोधकांनी उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली होती. या प्रकरणातली याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली ज्या सुनावणीदरम्यान न्यायालयाला पोलिसांकडून हे उत्तर देण्यात आलं आहे.

पोलिसांनी फेटाळले सीजेपीचे आरोप

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा म्हणून हे आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी चालत येणाऱ्या आंदोलकांवर आम्ही बळाचा वापर लगेच सुरु केला नाही. त्यांनी म्हणजेच सीजेपीने केलेले आरोप योग्य नाही. आम्हाला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करण्याचा आदेश दिला कारण आंदोलक हिंसकपणे वागत होते. त्यामुळे परिस्थिती आम्हाला नियंत्रणात आणायची होती असंही पोलिसांनी सांगितलं. तसंच पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीचे आरोप फेटाळले आहेत.

मोठ्या रॅलीजमध्ये साध्या वेशातले पोलीस असतातच

एवढंच नाही तर पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल करत असंही सांगितलं आहे की अनेकदा ज्या ठिकाणी काहीतरी घडण्याची अपेक्षा असते अशा ठिकाणी साध्या वेशातले पोलीस हे खबरदारीचा उपाय म्हणून असतात. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन यावेळी पोलीस गणवेशात असतात. पण इतर वेळी जेव्हा मोठ्या रॅलीज होणार आहेत, आंदोलन होणार आहे असं आधीपासून ठाऊक असतं तेव्हा साध्या वेशातले पोलीस घडामोडींवर लक्ष ठेवून असतात.साध्या वेशातील पोलिसांना स्पॉटर असं म्हटलं जातं. गर्दी नियंत्रित करण्याच्या उपाय योजनांमध्ये त्यांचा उपयोग होतो. सगळे स्पॉटर आंदोलकांमध्ये मिसळले होते. या रॅलीचा फायदा घेऊन गुन्हे करण्याचा प्रयत्न कुणी केला तर त्याचा त्रास आंदोलकांना होऊ नये याचीही काळजी पोलीस घेत होते असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.