पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने पतीची याचिका फेटाळून लावली आहे. पतीन सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने पतीला दोषी ठरवलं होतं. पतीने दुसरं लग्न केल्याने पत्नीने आत्महत्या केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. विवाहित महिला तिच्या पतीबद्दल खूप पझेसिव्ह असते. ती तिच्या नवऱ्याला इतर कोणासोबतही पाहू शकत नाही, असं मत अलहाबाद हायकोर्टाने नोंदवलं आहे. तसेच पतीची फेरविचार याचिका फेटाळून लावली आहे. पत्नीने पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आत्महत्या केली होती. सप्टेंबर २०१८ मध्ये आरोपी सुशील कुमारच्या पत्नीने त्याच्या आणि कुटुंबातील सर्व सदस्यांविरुद्ध आयपीसीच्या कलम ३२३, ४९४, ५०४, ५०६, ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यात महिलेनं आरोप केला होता की, आरोपीचे आधीच दुसऱ्या महिलेसोबत लग्न झाले आहे. त्या लग्नापासून त्याला दोन मुले आहेत. त्यानंतर घटस्फोट न घेता त्याने तिसरे लग्न केले.

कोणत्याही विवाहित महिलेसाठी तिच्या पतीने दुसऱ्या महिलेसोबत राहणे दु:खदायी असतं, असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. पतीने दुसऱ्या महिलेशी गुपचूप लग्न केल्याचे समजल्यानंतर या महिलेने आत्महत्या केली आहे. महिलेने आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांवर मारहाण, गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. जेव्हा आरोपीने तिला सोडून एका नवीन महिलेला आपल्या घरात ठेवले तेव्हा महिलेने गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली.अलाहाबाद हायकोर्टाच्या न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी यांच्या खंडपीठाने पतीची फेरविचार याचिका फेटाळताना सांगितले की, भारतीय महिला कोणत्याही परिस्थितीत तिच्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहू शकत नाही.

आरोपी सुशील कुमारने सप्टेंबर २०१८ मध्ये तिसरे लग्न केल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे महिलेच्या आत्महत्येच्या निर्णयामागे पतीचे तिसरे लग्न हे एकमेव कारण असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळून लावली.