कुठल्याही व्यक्तीला त्याचा रंग, उंची, वजन किंवा कुठल्याही शारिरीक व्यंगावरून बोलणं किंवा शरीरावरुन अभद्र टिप्पणी करणं ही एक प्रकारची विकृती मानली जाते. अशा प्रकारचं कृत्य करणं पत्ती-पत्नीच्या घटस्फोटाला कारणीभूत ठरू शकतं. कर्नाटक उच्च न्यायालयाने यासंदर्भात आज एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पत्नीने पतीचा त्याच्या त्वचेच्या काळ्या रंगामुळे अपमान करणे ही क्रूरता आहे, असं म्हणत कर्नाटक उच्च न्यायालयाने पतीकडे घटस्फोट घेण्याचं एक वैध कारण आहे, असं मत मांडलं आहे. न्यायालयाने एका ४४ वर्षीय व्यक्तीला त्याच्या ४१ वर्षीत पत्नीपासून घटस्फोट घेण्यास परवानगी मागणाऱ्या याचिकेवर हा निकाल दिला.
न्यायालयाने म्हटलं आहे की, उपलब्ध पुरावे बारकाईने तपासल्यानंतर असं लक्षात येतंय की, पत्नी तिच्या पतीचा काळ्या रंगामुळे अपमान करत होती. दोघांमधील भांडणांमुळे दोघेही वेगळे राहत होते. यावेळी न्यायालयाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३(१)(अ) अन्वये घटस्फोटाच्या याचिकेला परवानगी दिली. त्याचबरोबर आपल्यावरील आरोप लपवण्यासाठी पत्नीने तिच्या पतीवर अवैध संबंधांचे खोटे आरोप केले आणि ही वस्तुस्थिती असू ही एक प्रकारची क्रूरताच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
बंगळुरू येथील रहिवासी असलेल्या या जोडप्याचं २००७ मध्ये लग्न झालं होतं. या दाम्पत्याला एक मुलगी आहे. पतीने २०१२ मध्ये बंगळुरू येथील कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. त्यानंतर महिलेने भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ अ तसेच कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तिचा पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच ती तिच्या मुलीला पतीच्या घरात ठेवून माहेरी राहू लागली होती.
हे ही वाचा >> Video: लोकसभेत पंतप्रधान मोदींवर अविश्वास प्रस्ताव; काँग्रेसनं विचारले तीन प्रश्न, म्हणाले…
त्याचबरोबर या महिलेने पती आणि सासरच्या मंडळींवर अत्याचार केल्याचा आरोप केला. घटस्फोटासाठी पतीचा अर्ज कौटुंबिक न्यायालयाने २०१७ मध्ये फेटाळला होता, त्यानंतर पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करताना म्हटलं की, पत्नी तिच्या पतीच्या त्वचेच्या काळ्या रंगामुळे त्याचा अपमान करत होती. परंतु तो त्याच्या चिमुरड्या मुलीकडे पाहून हा अपमान सहन करत होता. पतीला काळ्या रंगावरून हिणवणं ही एक प्रकारची क्रूरता आहे.
