पती पत्नीचं नातं हे जगातलं असं नातं आहे ज्यात प्रेम, विश्वास, आपुलकी, माया, भावना या सगळ्यालाच स्थान असतं. मात्र या सगळ्याला तडा देण्याचं काम एका महिलेने केलं आहे. घटना आहे कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यातली. एका महिलेने पतीच्या मृत्यूनंतर २० दिवसांनी लग्न केलं तेव्हा सगळ्यांनाच त्यांचं आश्चर्य वाटलं होतं. सुरुवातीला या महिलेने असं सांगितलं होतं की तिच्या पतीचा मृत्यू हार्ट अटॅक आल्याने झाला. मात्र एक महिन्याने हत्येची घटना समोर आली. पोलिसांनी सगळ्या गोष्टी धुंडाळाल्या आणि समोर आला हत्येचा भयंकर प्रकार. या महिलेने तिच्या पतीची हत्या तिच्या प्रियकरासह मिळून केली.

नेमकी काय घडली घटना?

तुमकरु या ठिकाणी हेब्बूर होबळीच्या दसराहल्ली गावात राहणाऱ्या परमेश या माणसाचा ३० जानेवारीला मृत्यू झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो वारला असं त्याच्या पत्नीने म्हणजेच आशाने सगळ्यांना सांगितलं. आशाने रडून ही गोष्ट परमेशच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या इतर नातेवाईकांना तसंच गावातल्या लोकांना सांगितली. त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला आणि मृतदेवर अंत्यसंस्कार केले. त्यावेळी कुणालाही हे वाटलं नव्हतं की परमेशची हत्या करण्यात आली आहे. त्याचा मृत्यू नैसर्गिक नाही तर एक जाणीवपूर्वक आखलेला कट आहे.

२० दिवसांनी आशाने केलं दुसरं लग्न

पती परमेशच्या मृत्यूनंतर अवघ्या २० दिवसांनी आशाने तिचा मित्र चंद्रप्पाशी लग्न केलं. गावात जेव्हा ही बातमी समजली तेव्हा आशाबद्दल विविध चर्चा सुरु झाल्या. परमेशच्या बहिणींना आशावर संशय आला. त्यांना हे वाटून गेलं परमेशच्या मृत्यूनंतर अवघ्या २० दिवसात आशाने लग्न कसं काय केलं? यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार किंवा अशी गोष्ट असणार जी समोर आलेली नाही. परमेशच्या बहिणींनी हा सगळा प्रकार हेब्बूर पोलीस ठाण्यात जाऊन सांगितला आणि तक्रार दाखल केली. आमच्या भावाचा म्हणजेच परमेशचा मृत्यू नैसर्गिक नाही असा आम्हाला संशय आहे असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. आशा आणि चंद्रप्पा यांच्यात प्रेमसंबंध आधीच होते त्यामुळेच परमेशचा काटा काढण्यात आला असा संशय आहे असंही या बहिणींनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली आणि तपास सुरु केला. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परमेशचं प्रेत कबरीतून बाहेर काढलं. त्यानंतर या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. तसंच आवश्यक ते नमुनेही घेण्यात आले. एवढंच नाही तर पोलिसांनी आशा आणि चंद्रप्पा यांचीही चौकशी सुरु केली. ते दरवेळी वेगवेगळ्या गोष्टी रचून सांगत आहेत हे पोलिसांना कळलं. तपासादरम्यान चंद्रप्पाने अखेर गुन्हा कबूल केला. आशा आणि त्याने मिळून परमेशला ठार मारलं आहे हे त्याने मान्य केलं अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परमेशचं तोंड दाबण्यात आलं. ज्यामुळे त्याला नीट श्वास घेता आला नाही. श्वास कोंडल्याने त्याच्या मृत्यू झाला. मात्र आशाने ही हत्या नाही तर हार्ट अटॅक आहे आणि परमेशचा मृत्यू झाला आहे ही बाब सगळ्यांना सांगितली. मात्र अखेर सत्य समोर आलंच. पोलिसांनी या प्रकरणात आशा आणि चंद्रप्पा या दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.