Honeymoon Divorce Case: लग्न झाल्यानंतर एकमेकांची ओळख व्हावी, प्रेम फुलावे यासाठी अनेक जोडपे हनिमूनला जात असतात. आयुष्यभरासाठी पुरतील अशा आठवणी जोडपे गोळा करतात. लग्न ठरल्यापासून झालेली धावपळ, लग्नाची गडबड, आर्थिक बाबींची जुळवाजुळव आणि त्यातून निर्माण झालेला ताण थोडा हलका होण्यासाठी हनिमून उपयोगी ठरतो. पण मेरठमधील एका जोडप्याचा हनिमून लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरला. याचे कारणही मजेशीर आहे.

पतीच्या ‘त्या’ कृतीमुळे पत्नी संतापली

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, घटस्फोट मागणारी पत्नी उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील रामराज परिसरात राहणारी होती. तर पती दिल्लीच्या पटेल नगरमध्ये राहण्यास आहे. दोघांची एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून ओळख झाली आणि त्यानंतर लग्न झाले.

लग्न झाल्यानंतर जोडप्याने नैनीताल येथे हनिमूनला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र हनिमूनला जाताना पतीने आपल्या कुटुंबालाही बरोबर घेतले. हनिमून हा आपल्यातला खासगी विषय असून फक्त दोघेच जायला हवे, असे पत्नीचे मत होते. पण जेव्हा प्रत्यक्ष ते नैनीतालला निघाले, तेव्हा पतीच्या कुटुंबीयांना पाहून पत्नीला धक्काच बसला.

संपूर्ण कुटुंबासह नैनीतालहून परतल्यानंतर पती आणि पत्नीमध्ये वारंवार खटके उडू लागले.

Pune Couple Divorce 24 hours After Wedding
दोन वर्षांपासून प्रेमसंबंध, लग्नानंतर २४ तासात डॉक्टर-इंजिनिअर जोडप्याचा घटस्फोट; पुण्यातील घटनेत नेमकं काय झालं?

पतीला अडचणच कळली नाही

पत्नीचे म्हणणे होते की, पतीचे कुटुंबीय हनिमूनला आल्यामुळे त्या दोघांना एकमेकांना म्हणावा तसा वेळ देता आला नाही. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस हे दोघांसाठीही खास असतात. यावेळी थोडा अधिक आणि चांगला वेळ एकमेकांना देणे गरजेचे होते. पण सिंगापूर मध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या पतीला मात्र यात कोणतीही अडचण दिसत नव्हती.

समुपदेशकाने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या कुटुंबाला हनिमूनला नेण्यात पतीला काहीही चुकीचे वाटत नव्हते. उलट यानिमित्ताने कुटुंबियांनाही आनंद देता आला. तसेच कुटुंबियांना आपल्याबरोबर नेऊन कोणतीही चूक केली नाही, असे त्याचे ठाम होते.

नवभारत टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, या जोडप्याने दुबईला फिरायला जाण्याची योजना आखली आणि तेव्हापासून त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यावेळी आपण दोघेच जाऊ, असे पत्नीने बजावले होते. मात्र पतीने पुन्हा एकदा कुटुंबयांना बरोबर नेण्याची इच्छा व्यक्त केली.

प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले

दाम्पत्यामधील तणाव वाढत गेल्याने अखेरीस प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत घालून त्यांच्यातील मतभेद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र यातून कोणताही तोडगा निघू न शकल्याने हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्राकडे वर्ग करण्यात आले.

कौटुंबिक समुपदेशन केंद्रातील समुपदेशकांनी लग्न वाचण्यासाठी पती-पत्नीबरोबर तीन स्वतंत्र सत्रे घेतली. समुपदेशकांच्या मते, दोन्ही बाजूंचे म्हणणे स्वतंत्रपणे ऐकून घेण्यात आले. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी पती-पत्नीने एकमेकांवर गंभीर आरोप केले. दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचे वारंवार प्रयत्न करूनही दोन्ही बाजू आपली भूमिका बदलायला तयार नव्हत्या. दोघेही वेगळे होण्यावर ठाम होते.