Karnataka : कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर दोन महिन्यांतच पत्नीने प्रियकरासह पलायन केलं आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात पत्नीने प्रियकराबरोबर पलायन केल्यामुळे तणावात येऊन पती आणि त्यांचं लग्न जमावणाऱ्या भावाने स्वत:चं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

कर्नाटकच्या दावणगेरे जिल्ह्यात ही घटना घडली आहे. झालं असं की, सोमवारी एका ३० वर्षीय व्यक्तीने त्याच्या पत्नीने लग्नाच्या तीन महिन्यांतच प्रियकराबरोबर पलायन केल्याचा आरोप करत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच या दोघांचं लग्न जुळवणाऱ्या भावानेही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने फिरवत बुधवारी संबंधित महिलेला अटक केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली आहे. दरम्यान, पती ३० वर्षीय हरीश आणि ३६ वर्षीय रुद्रेश अशी मृतांची ओळख पटली असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हरीशने तीन महिन्यांपूर्वीच लग्न केलं होतं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “हरीशची पत्नी मंदिरात जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, त्यानंतर ती पुन्हा घरी परतलीच नाही. तिने मंदिरात जाण्याऐवजी तिने प्रियकराबरोबर पलायन केलं. त्यानंतर ही माहिती पती हरीशला समजल्यानंतर या घटनेला जबाबदार असलेल्या काही व्यक्तींच्या नावाचा चिठ्ठीत उल्लेख करत आत्महत्या केली. आता पती हरीशने आत्महत्या केल्याची माहिती कळताच त्यांचं लग्न जमावणाऱ्या रुद्रेशनेही आपलं जीवन संपवलं”, अशी माहिती पोलिसांनी सांगितली.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की लग्नाच्या काही दिवसांनंतर ही महिला पोलीस ठाण्यात गेली होती. हरीश आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध तिने छळाचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, हरीशने चिठ्ठीत आरोप केला की त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर धमकावत होते. दरम्यान, या प्रकरणी दावणगेरे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.