नेपाळमधील राजकीय मुत्सद्दय़ाचा नातेवाईक असल्याचा दावा करणाऱ्या एका बडय़ा उद्योगपतीने भारताच्या आण्विक प्रकल्पातील युरेनियमची विक्री करण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि त्यामुळे १९७३च्या अखेरीस अमेरिकेत खळबळ माजविणाऱ्या पत्रांचा पाऊस पडला होता.
तथापि, अमेरिकेतील मुत्सद्दय़ांमध्ये यावरून झालेली चर्चा, भारतीय आण्विक प्रकल्पातील अधिकाऱ्यांशी करण्यात आलेली सल्लामसलत आणि नेपाळी व्यक्तीने दिलेल्या नमुन्यांची करण्यात आलेली चाचणी यावरून युरेनियम विक्रीचा प्रस्ताव धादांत खोटा असल्याचे सिद्ध झाले. विकिलीक्सने किसिंजर केबल्स जारी केल्या असून त्यामध्ये भारताचा सहभाग असलेल्या खळबळजनक केबल्सचाही समावेश आहे. मुंबईतील क्षेत्रात असलेल्या आण्विक प्रकल्पातून युरेनियमची तस्करी करण्यात आल्याचेही म्हटले आहे. काठमांडूतील अमेरिकेच्या दूतावासातून २६ सप्टेंबर १९७३ रोजी आलेल्या संदेशात म्हटले आहे की, जे. सी. ठाकूर नामक नेपाळी उद्योगपतीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रति किलो ४० हजार डॉलर दराने दरमहा तीन किलो युरेनियम विक्रीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावरून असा विक्रीचा प्रस्ताव देण्यात आल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. मुंबई क्षेत्रातून यू-२३५ची तस्करी करण्यात आली असून ते आपल्याकडे पोहोचले आहे, असे ठाकूर यांनी सूचित केल्याचे संदेशात म्हटले आहे. इतकेच नव्हे तर ठाकूर यांनी त्याचे नमुने चाचणीसाठी उपलब्ध करून देण्याची तयारीही दर्शविली होती, असे म्हटले आहे. अमेरिका सरकार युरेनियम खरेदी करण्यास इच्छुक नसल्यास ठाकूर यांनी काठमांडूतील जर्मनी, चीन आणि जपानच्या दूतावासांशी विक्रीच्या प्रस्तावाबाबत संपर्क साधणार असल्याचे सांगितले होते.