इंटरनेटवरील माहितीचा भंडार म्हणजे विकीपीडिया. अगदी शालेय किंवा कॉलेजमधील प्रोजेक्टसाठी लागणारी माहिती असो किंवा ऑफिसमधील एखाद्या प्रेझेंटेशनसाठी लागणारी माहिती असो विकीपीडियाला पर्याय नाही. अगदी कोणतीही माहिती विकीपीडियावर सहज आणि सोप्या भाषेत अगदी विस्तृतपणे उपलब्ध असते. अनेकदा एका गुगल सर्चवर सर्वात आधी विकीपीडिया पेजेसचा संदर्भ दिला जातो. मात्र इंटरनेटवरील मोफत माहितीचा सर्वात मोठा भंडार असणाऱ्या याच विकीपीडियाला आता नेटकऱ्यांची मदत हवी आहे.

विकीपीडियाने आपल्या अनेक पेजेसवर वेगवेगळ्या देशांमधील युझर्सकडे देणगी देण्याचे आवाहन केलं आहे. भारतीयांनीही विकीपीडियाचे कोणतेही पेज ओपन केल्यावर एक नोटीफिकेशन बॉक्ससारखा पॉपअप बॉक्स उघडतो. यामध्ये विकीपीडियाच्या संस्थापकांनी मोफत माहिती उपलब्ध करुन देण्याचा हा उपक्रम सुरु ठेवण्यासाठी अवघे १५० रुपये देणगी म्हणून विकीपीडियाला द्या असं भावनिक आवाहन नेटकऱ्यांना केलं आहे.

काय आहे या पॉपअप बॉक्समधील मजकूर

भारतातील सर्व वाचकांसाठी,

बोलायला थोडं अवघडल्यासारखं होतयं त्यामुळेच आम्ही थेट मुद्द्यावर येतो, विकीपीडियाचे स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी आम्हाला मदत करा. विकीपीडियाचे संपूर्ण काम हे देणगीवर चालते. देणगीची रक्कम सरासरी एक हजार रुपये इतकी असते. मात्र ९८ टक्के वाचक ही देणगी देत नाही. जर हा मजकूर वाचणाऱ्या प्रत्येकाने १५० रुपये म्हणजेच आठवड्याभराच्या चहा कॉफिचा खर्च देणगी म्हणून दिला तर त्यामधून विकीपीडियाला मोठी मदत मिळू शकते. जेव्हा आम्ही ना नफा ना तोटा तत्वावर विकीपीडिया सुरु केले तेव्हा काही लोकांनी आम्हाला याचा पश्चाताप होईल असा इशारा आम्हाला दिला होता. मात्र विकीपीडिया शशुल्क सेवा झाल्यास जगभरातील नेटकऱ्यांचा मोठा तोटा होईल. ज्ञानाची तहान असणाऱ्या आपल्या सर्वांना विकीपीडिया एकत्र आणते आणि बांधून ठेवते. माहितीची भरणा करणारे, वाचक आणि देणगीदार यांच्यामुळेच आज विकीपीडिया सुरु आहे. विश्वासार्ह, तटस्थ माहिती देण्यासाठी काम करणारे लोक हीच विकीपीडियाची खरी ऊर्जा आहे. विकीपीडियाची अशीच वाढ होत रहावी म्हणून आम्हाला मदत करा. धन्यवाद!

विकीपीडियाला देणगी देण्यासाठी अगदी क्रेडीटकार्ड, डेबिट कार्डपासून पेटीएम आणि युपीआय पेमेंटचा पर्यायही युझर्सला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याआधीही मागील वर्षी विकीपीडियाने अशाप्रकारेच भारतीयांना देणगी देण्याचे आवाहन केलं होतं.