PM Modi AI Summit 2026: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर टेक कंपन्यांतील नोकऱ्यांवर गदा आणणार असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. संगणकावर काम करणाऱ्यांच्या रोजगारावर मर्यादा येणार असल्याचे भाकीत टेक दिग्गजांनी यापूर्वी वर्तवले आहे. साहजिकच दिल्लीत होत असलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्येही याची चर्चा होणे, अपेक्षित होते. पंतप्रधान मोदींनीच या चर्चेला सुरूवात केली असून मंगळवारी त्यांनी युवकांच्या मनातील संभ्रमावर भाष्य केले.

पाच दिवस चालणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’चे अधिकृत उद्घाटन १९ फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते होणार आहे. तत्पर्वी १७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सविस्तर भाष्य केले.

वर्षभरापासून टेक कंपन्यांमध्ये नोकरकपात होत आहे. भारतात टेक कंपन्यांचे मोठे जाळे असून लाखो कर्मचारी यात काम करतात. मात्र नोकरकपातीच्या भीतीमुळे या क्षेत्रावर चिंतेचे ढग दाटले आहे. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “चांगली तयारी करणे हाच भीतीवरील सर्वोत्तम उपाय आहे.”

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नोकऱ्या जात नाहीत, उलट त्या वाढतात, हे इतिहासातून आपण शिकले पाहिजे. तंत्रज्ञानामुळे कामाचे स्वरुप बदलते आणि नव्या संधी निर्माण होतात. काही कामांमध्ये कौशल्यात थोडासा बदल करावा लागेल. परंतु डिजिटल परिवर्तनामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत नवीन संधी निर्माण होऊ शकतात. एआयच्या युगातही नव्या नोकऱ्या निर्माण होतील.

“एआय आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. लोकांच्या क्षमता विकसित करण्यासाठी एआयचे अभूतपूर्व योगदान ठरू शकते. पण यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. अन्यथा यामुळे अनेक आव्हाने निर्माण होऊ शकतात. यामुळेच आम्ही या समिटमध्ये फक्त इनोव्हेशनच नाही तर त्याच्या संभाव्य परिणामांवरही लक्ष केंद्रीत केले आहे. तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश सर्वांचे कल्याण होणे, हाच असला पाहिजे”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

एआय इम्पॅक्ट समिटचा उद्देश काय?

दिल्लीत होत असलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’चा उद्देश जागतिक ‘एआय’ व्यवस्थापन आणि सहकार्यासाठी समान आराखडा जाहीर करणे हा आहे. या समिटमध्ये रोजगारांवर होणारा परिणाम, बालसुरक्षा, नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या क्षेत्रातील नामवंत चर्चा करतील. ‘एआय-एक्स्पो’मध्ये जागतिक तंत्रज्ञान कंपन्या, नवउद्योजक (स्टार्टअप्स), विद्यापीठे व संशोधन संस्था, केंद्र सरकारची मंत्रालये, राज्य सरकारे आणि आंतरराष्ट्रीय भागीदार सहभागी झाले आहेत.

ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, सर्बिया, एस्टोनिया, ताजिकिस्तान आणि आफ्रिका अशा १३ देशांचे मंडप (स्टॉल) उभारण्यात आले आहेत. ‘लोक, पृथ्वी आणि प्रगती’ या तीन विषयांतर्गत ३००हून अधिक दालनांमध्ये थेट प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत. ६००हून अधिक नवउद्योजक कंपन्या प्रत्यक्ष वापरात असलेल्या उपाययोजना मांडत आहेत. ५००हून अधिक सत्रांमध्ये ३,२५०हून अधिक वक्ते सहभागी होत असून ‘एआय’चा सर्व क्षेत्रांवर बदलांचा परिणाम आणि भविष्यातील दिशा यावर सखोल चर्चा होणार आहे.