अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील हॉटेलचा लिलाव होणार असून या लिलाव प्रक्रियेत हिंदूमहासभेचे नेते स्वामी चक्रपाणी हे देखील सहभागी होणार आहेत. दाऊदचे हॉटेल पाडून त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधणार अशी घोषणाच त्यांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तस्करी आणि विदेश चलन विनिमय कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. २०१५ मध्ये दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी प्रक्रीयादेखील पार पडली. मात्र लिलाव होऊ शकला नव्हता. आता पुन्हा एकदा दाऊदच्या संपत्तीच्या लिलावाची प्रक्रिया सुरु होणार आहे.

भेंडीबाजारमधील हॉटेल रौनक अफरोज (दिल्ली जायका या नावानेही हे हॉटेल ओळखले जाते) या हॉटेलचा यात समावेश आहे. १४ नोव्हेंबरपासून लिलाव प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या लिलाव प्रक्रियेत हिंदू महासभेचे नेते स्वामी चक्रपाणी हे सहभागी होणार आहेत. याविषयी माहिती देताना चक्रपाणी म्हणाले, अफरोज हॉटेल खरेदी केल्यावर मी ते पाडणार आणि त्या जागेवर जनतेसाठी सार्वजनिक शौचालय बांधणार आहे. गुन्हेगाराची संपत्ती विकत घेऊन त्यावर शौचालय बांधून मी गुन्हेगारांना संदेश देऊ इच्छितो. दहशतवादाचा अंत असा होतो हे मला दाखवायचे आहे, असे त्यांनी सांगितले. या सार्वजनिक शौचालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी टाडा न्यायालयाने १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल सुनावला होता. या प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावताना इतर ३३ फरारी आरोपींची संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने सीबीआयला दिला होते. यानंतर सीबीआयने अर्थ मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या महसूल विभागाची मदतीने दाऊदच्या संपत्तीची यादी तयारी करण्याचे कामही हाती घेतले होते.