पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी दिशा ठरवताना भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी पक्षाची संघटना आणखी मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच पूर्वेकडील राज्यात भाजपाचा उदय अजून व्हायचा बाकी आहे असे म्हटले. नड्डा यांनी पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांना आश्वासन दिले की भाजपा बंगालमध्ये एक नवीन कथा लिहिणार आहोत.

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारामन, एस जयशंकर, अनुराग ठाकूर, मुख्तार अब्बास नक्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर नेते उपस्थित होते. त्याच वेळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनी व्हर्च्युअली बैठकीत भाग घेतला.

प्रमुख जेपी नड्डा यांनी रविवारी करोना महामारीच्या काळात आर्थिक आव्हाने हाताळल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी साथीच्या काळात कठोर परिश्रम केले आहेत. त्यांनी लॉकडाऊनसारखा ‘धाडसी निर्णय’ वेळेत घेतला. आणि त्यातून उद्भवणार्‍या आर्थिक आव्हानांना अधिक चांगल्या पद्धतीने हाताळले, असे नड्डा म्हणाले.

राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या सुरुवातीला संबोधित करताना नड्डा म्हणाले, “लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला होता आणि लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या आत देशभरातील लोकांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोविडशी लढण्यासाठी ट्रॅक-टेस्ट आणि उपचारांचा समावेश असलेली ‘थ्री टी’ पद्धत देखील लागू करण्यात आली होती.”

जेपी नड्डा यांनीही नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाचे मताधिक्य वाढवल्याबद्दल कौतुक केले. “सार्वत्रिक निवडणुकांपासून ते पंचायत निवडणुकीपर्यंत भाजपाच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. खरे तर भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये चांगले काम केले आहे आणि करत आहे. भारतातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रगतीशील धोरणे आणि कायदे आणून देशातील शेतकऱ्यांची समृद्धी सुनिश्चित करणारे पंतप्रधान मोदी हे एकमेव नेते आहेत,” असे जेपी नड्डा म्हणाले.

लोकांना करोनावरील लसीचा दुसरा डोस योग्य वेळी मिळावा यासाठी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. याशिवाय नड्डा यांनी कलम ३७० रद्द करण्यापासून केंद्र सरकारच्या विविध धोरणात्मक उपक्रमांचे आणि आसाम आणि त्रिपुरामधील विविध शांतता करारांचे कौतुक केले.

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या उदयाचा संदर्भ देत नड्डा म्हणाले की, “भाजपाच्या उदयाचे राजकारणाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केल्यास असे दिसून येईल की भारतीय राजकीय इतिहासात फारच कमी घडले आहे. प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे १० कोटी लोकसंख्या असलेल्याच्या या राज्यात भाजपावरील जनतेच्या विश्वासात झपाट्याने विकास झाला आहे. २०१० च्या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी नगण्य असताना, गेल्या निवडणुकीत त्यांना ३८ टक्के मते मिळाली होती. पक्षाने लोकसभेत ८ आणि विधानसभेत ७७ जागा जिंकल्या.”

आपल्या भाषणात नड्डा यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीचा विशेष उल्लेख केला आणि निवडणुकीनंतरच्या हिंसाचारात राज्यात पक्षाचे ५३ कार्यकर्ते मारले गेले, तर एक लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले, असा आरोप केला. आगामी निवडणुका भाजपा लोकशाही मार्गाने लढेल आणि अराजक घटकांना उत्तर देईल असेही नड्डा म्हणाले.

“भाजपा बंगालच्या जनतेसोबत खडकाप्रमाणे उभा आहे. आगामी काळात जेव्हाही बंगालमध्ये निवडणुका होतील तेव्हा बंगालला वाचवण्यासाठी, बंगालमध्ये लोकशाही आणि संविधान बहाल करण्यासाठी भाजपा आपली लढाई लोकशाही मार्गाने लढवेल. भाजपाचा सातत्याने विस्तार होत असला तरी त्यांच्यासमोर अजूनही काही आव्हाने आहेत,” असे नड्डा म्हणाले.

या बैठकीत याचा आढावा घेण्यात आला आणि केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येईल असे ते म्हणाले. भाजपाचा उदय अजून व्हायचा आहे असे नड्डा यांनी म्हटले.