महाविकास सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केल्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपण उद्या म्हणजेच ३० जून रोजी मुंबईत येत असल्याची घोषणा केलीय. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुंबईमधील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच दुसरीकडे गुवाहाटीमध्ये वास्तव्यास असलेल्या बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. शिंदे यांनी देवदर्शनानंतर आपण उद्या मुंबईत येऊन बहुमत चाचणीसाठी हजर राहणार असल्याची घोषणा केलीय.

नक्की वाचा >> “एका बाजूला आपल्या पुत्राने…” मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवहानानंतर आदित्य, राऊतांच्या वादग्रस्त विधानांवरुन शिंदेंचा सवाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमध्ये मंगळवारी रात्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर शिंदे यांनी गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू या हॉटेलमधील बंडखोर आमदारांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पुढील निर्णय आणि वाटचालीसंदर्भात शिंदे यांनी सहकारी आमदारांशी चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. रात्री घेतलेल्या या बैठकीनंतर आज सकाळी आठच्या सुमारास एकनाथ शिंदे हे गुवाहाटीमधील कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचले.

नक्की वाचा >> “फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आस धरून बसले असतील तर…”, शिवसेनेचा थेट इशारा; राष्ट्रवादीविरोधावरुन बंडखोरांवरही टीका

एकनाथ शिंदे यांना व्हाय दर्जाची सुरक्षा केंद्राकडून पुरवण्यात आल्याने ते या मंदिरात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला. मंदिर परिसराला काहीकाळ लष्करी छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. एकनाथ शिंदे यांचे मंदिरमध्ये देवीचं दर्शन घेतानाचे फोटो एएनआयने शेअर केले आहेत. यावेळेस शिंदेंसोबत देवदर्शनासाठी बंडखोर आमदारांमधील चार आमदार सोबत होते.

नक्की वाचा >> ‘काय झाडी… काय डोंगार… काय हाटील…’ने सोडवली पुणेकरांची मोठी समस्या; ही शक्कल पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय आयडीया…’

देवदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांनी, “मी इथे महाराष्ट्राच्या शांतीसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करायला आलोय. उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईला जाणार असून त्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करणार आहे,” असं सांगितलं.

दरम्यान, फडणवीस हे मंगळवारी दिल्लीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन रात्री मुंबईत परतले. त्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ‘‘शिवसेनेच्या ३९ आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. याशिवाय काही अपक्षांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. ४६ आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे,’’ अशी मागणी भाजपाने केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गट आज म्हणजेच २९ जून रोजी दुपारनंतर मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यपालांच्या पत्राची प्रत मिळाल्यानंतर शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार की नाही यावर हा निर्णय अवलंबून राहणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will go to mumbai tomorrow for the floor test rebel shiv sena leader eknath shinde scsg
First published on: 29-06-2022 at 09:13 IST