वर्ल्ड ट्रेड सेंटर ट्विन टॉवर्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (९/११) अमेरिकेने ज्या पद्धतीने दहशतवादाशी लढा दिला आहे. याच पद्धतीने दहशतवाद संपवला जाऊ शकतो, असे मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केले आहे. नवी दिल्लीत आयोजित दोन दिवसीय ‘रायसीना डायलॉग’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
रावत म्हणाले, आपल्याला दहशतवाद संपवावा लागेल आणि असे आपण तेव्हाच करु शकतो जसे अमेरिकेने ९/११ च्या हल्ल्यानंतर दहशतवादाच्या बिमोडासाठी केले होते. अमेरिकेच्या लोकांनी दहशतवादाविरोधात वैश्विक युद्ध छेडले होते. दहशतवाद संपवण्यासाठी दहशतवाद्यांबरोबर त्यांना फंडिंग करणाऱ्यांनाही शिक्षा व्हायला हवी. त्याचबरोबर दहशतवादी संघटनांसोबत शांतता करार करताना याची गॅरंटी त्यांच्याकडून घ्यायला हवी. त्यासाठी जसे तालिबान किंवा दहशतवादी कारवायांमध्ये अडकलेली इतर कोणतीही संघटनांना आपली कृत्ये थांबवावीच लागतील. तसेच त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे लागेल.
शाळा, कॉलेजेस आणि धार्मिक स्थळी कट्टरवादाचे धडे
लोकांना कट्टर बनवणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करणेही गरजेचे आहे. शाळा, कॉलेजेस इतकेच नव्हे धार्मिक स्थळांवरही कट्टरतेचे धडे दिले जात आहेत. अशा प्रकारे कट्टरता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर लोकांमध्ये किती कट्टरता शिल्लक आहे हे शोधणे गरजेचे आहे. जे लोक पूर्णपणे कट्टर बनले आहेत त्यांच्यापासून काम सुरु करावे लागेल. जम्मू-काश्मीरमध्ये लोकांना कट्टर बनवले गेले. १२ वर्षांच्या मुला-मुलींनाही कट्टरतेचे धडे दिले जात आहेत. या लोकांना हळूहळू कट्टरतेपासून दूर केले जाऊ शकते. त्यासाठी कट्टरताविरोधी कँप बनवावे लागतील. पाकिस्तान देखील हेच करीत असून त्याठिकाणी असे कट्टरताविरोधी कँप आहेत ज्यांना दहशतवादी संघटना नुकसान पोहोचवत आहेत, असेही रावत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
दगडफेक करणाऱ्यांच्या चेहऱ्यांना पॅलेटगनचा निशाणा बनवले जात नाही
दरम्यान, भारतीय सैन्य काश्मीरमध्ये जरा जास्तच कडक धोरण अवलंबते असे वाटत नाही का? या प्रश्नावर रावत म्हणाले, लोकांमध्ये अशा प्रकारचा एक समज निर्माण झाला आहे की, दहशतवादाविरोधात लढाई सुरु असताना लष्कराने कडक धोरण अवलंबले आहे. मात्र, आता अशी परिस्थिती नाही. तसेच पॅलेटगनच्या वापराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, दगडही पॅलेट गन इतकेच घातक आहेत. दगडफेक करणाऱ्यांना कंटाळूनच आम्ही पॅलेट गनचा वापर सुरु केला. या पॅलेट गनद्वारे दगडफेक करणाऱ्यांच्या पायांना निशाणा बनवले जाते. बऱ्याचदा ते जमिनीवर पडलेले दगड उचलण्यासाठी खाली वाकतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही पॅलेट गनचे छर्रे लागतात. लष्कर दहगडफेक करणाऱ्यांच्या चेहऱ्यांना निशाणा बनवत नाही.
