NRI अर्थात अनिवासी भारतीय नागरिक भारतीय तरूणींशी विवाह करतात आणि नंतर त्यांना सोडून देतात. अशा नागरिकांविरोधात हिवाळी अधिवेशनात सरकार कायदा आणणार असल्याचं केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. पत्नीला सोडचिठ्ठी देणाऱ्या २५ एनआरआय लोकांचे पासपोर्ट आम्ही रद्द केले आहेत. आता या विरोधात आम्ही एक कायदा आणतो आहोत ज्या अंतर्गत अशा लोकांविरोधात कारवाई केली जाईल असे स्वराज यांनी म्हटले आहे.

१३ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने भारतीय महिलांची फसवणूक करणाऱ्या, त्यांना हुंड्यासाठी छळ करणाऱ्या अनिवासी भारतीयांविरोधात तुम्ही काय करत आहात अशी विचारणा केली होती. ज्यावर उत्तर देताना आम्ही अशा पुरुषांविरोधात कायदा आणणार आहोत असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. लग्न करून पत्नीचा छळ करणाऱ्या किंवा तिला सोडून देणाऱ्या अनिवासी भारतीयांविरोधात या कायद्यानुसार अटकेची तरतूद केली जाईल. तसेच त्यांनी पीडित महिलेला आर्थिक मदत केली पाहिजे अशीही तरतूद यामध्ये केली जाईल असेही स्वराज यांनी म्हटले आहे.