पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर जवळपास महिन्याभराने अमरिंदर सिंग यांनी मोठा निर्णय घेतला असून विशेष म्हणजे भाजपानेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढला तर भाजपाशी युती करणार असल्याचेही अमरिंदर यांनी जाहीर केले. पंजाबमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत.

अमरिंदर सिंग यांच्या प्रसारमाध्यम सल्लागारांनी काही ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिलीय. मागील काही दिवसांपासून दिल्लीत असणाऱ्या या सल्लागारांनी अमरिंदर सिंग यांच्यावतीने केलेल्या ट्विटमध्ये आधी, “पंजबाच्या भविष्यासाठीची लढाई सुरु झाली आहे. पंजाब आणि येथील लोकांच्या तसेच मागील वर्षभरापासून आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच नवीन पक्षाची घोषणा करणार आहे”, असं म्हटलंय.

“शेतकरी आंदोलनचा निकाल शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने लागला तर पंजाबच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपासोबत जागावाटप निश्चित करुन एकत्र निवडणूक लढवू. तसेच आमच्यासारखी विचारसणी असणाऱ्या पक्षांसोबत युतीचाही विचार आहे. खास करुन दिंडसा आणि ब्रम्हपूरमधील अकाली गटांसोबत युतीचा विचार आहे,” असंही माजी मुख्यमंत्र्यांच्या वतीने करण्यात आलेल्या ट्विट्समध्ये म्हटलं आहे.

भाजपाने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भाजपाने अमरिंदर सिंग यांना पंजाबमधील सर्वात मोठे नेते असं म्हटलं आहे. तर सुखदेव सिंग दिंडसा यांनी अद्याप अमरिंदर सिंग यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही असं म्हटलं आहे. सुखदेव हे शिरोमणी अकली दलचे (संयुक्त) अध्यक्ष आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरिंदर सिंग यांची पत्नी आणि खासदार परणीत कौर यांनी पक्ष सोडू नये म्हणून काँग्रेस प्रयत्न करत असल्याचे समजते.

पंजबाला सध्या राजकीय स्थैर्य आणि अंतर्गत तसेच बाहेरुन असणाऱ्या धोक्यापासून संरक्षण हवे असल्याने आपण पक्ष सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं अमरिंदर सिंग सांगतात. “मी लोकांना आश्वासन देऊ इच्छितो की शांतता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी मी प्रयत्न करेन, सध्या या दोन्ही गोष्टी येथे नाहीयत,” असंही म्हटलं आहे.

अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमध्ये आपला अपमान करण्यात आल्याचं सांगत पक्ष सोडत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्याचवेळी त्यांनी काँग्रेसमध्ये राहणार नाही पण इतर पक्षामध्येही जाणार नाही असं सांगत स्वत:चा पक्ष काढण्याचे संकेत दिले होते. सत्ताधारी कॉग्रेसबरोबरच आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल, भाजपासह अमरिंदर यांच्या नव्या पक्षामुळे पंजाबची आगामी विधानसभा निवडणूक पंचरंगी होईल.