Osman Hadis shooter: गुरुवारी रात्रीपासून बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा अराजक माजले आहे. अनेकठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. सिंगापूरमध्ये कट्टर भारत विरोधी विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादीचा मृत्यू झाल्यानंतर बांगलादेशमध्ये विविध ठिकाणी हिंसक निदर्शने केली जात आहेत. आंदोलकांनी माध्यम कार्यालये, सांस्कृतिक केंद्रांना लक्ष्य केले आहे. आता या प्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. हादीच्या मारेकऱ्याने बांगलादेशमध्ये भूकंप होणार असल्याची कल्पना त्याच्या प्रेयसीला देऊन ठेवली होती.
मागच्या आठवड्यात १२ डिसेंबर रोजी ढाका येथे दुचाकीवर बसलेल्या मुखवटाधारी हल्लेखोरांनी उस्मान हादीवर गोळ्या झाडल्या होत्या. फैजल करीम हा या हल्ल्यातील मुख्य आरोपी आहे. चौकशीदरम्यान अशी माहिती समोर आली की, फैजल करीमने आदल्या रात्री आपल्या प्रेयसीला सांगितले होते की, अशी एक घटना घडणार आहे, ज्यामुळे संपूर्ण बांगलादेश हादरून जाईल.
उस्मान हादीला गोळ्या लागल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने त्याला चांगल्या उपचारांसाठी एअर ॲम्बुलन्सने सिंगापूर येथे पाठवले होते. इथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. यानंतर बांगलादेशमधील परिस्थिती चिघळली. फेब्रुवारी २०२५ मध्ये बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या, त्यापूर्वीच अस्थिर वातावरण तयार झाले आहे.
हल्ल्याच्या आदल्या रात्री काय झाले?
बांगलादेशमधील तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ढाकाबाहेरील एका रिसॉर्टमध्ये मारेकरी फैजल आणि त्याची प्रेयसी मारिया अख्तर थांबले होते. हादीवर हल्ला करण्याच्या आदल्या दिवशी फैजलने प्रेयसीला सांगितले की, लवकरच अशी घटना घडणार आहे, ज्यामुळे संपूर्ण बांगलादेश हादरून जाईल. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, फैजलने हादीचा व्हिडीओही प्रेयसीला दाखवला होता. यावरून हा मोठ्या कटाचा भाग असल्याचे मानले जात आहे.
उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला असताना मुख्य आरोपी फैजल करीम आणि त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. बांगलादेशमधील माध्यमांनी दावा केला की, आरोपी भारतात पळून जाण्यास यशस्वी ठरले आहेत. मात्र ढाका पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही.
