Iran Allowed Indian Ships : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आज तब्बल १४ दिवस पूर्ण झाले आहेत. अमेरिका-इस्रायल रोज संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहे, तर इराणही प्रतिहल्ले करत असून हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह आहेत. या युद्धामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात असून या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना होत आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्याने कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती असल्यामुळे भारतालाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. मात्र, असं असताना भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
भारतीय जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. भारत आमचा मित्र असल्याचं राजदूत मोहम्मद फथाली (Mohammad Fathali) यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली यांनी संकेत दिले की, भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग मिळू शकतो. पत्रकारांशी बोलताना मोहम्मद फथाली म्हणाले की, या धोरणात्मक जलमार्गातून भारताला प्रवेश मिळावा यासाठी लवकरच पाऊल उचललं जाईल. दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताला सुरक्षित मार्ग मिळेल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, “हो. कारण भारत आमचा मित्र आहे. तुम्हाला ते दोन ते तीन तासांत दिसेल.”
दरम्यान, इराणचे राजदूत मोहम्मद फथाली यांनी यावेळी भारताचं वर्णन इराणसाठी एक महत्त्वाचा भागीदार म्हणून केलं. तसेच या प्रदेशातील दोन्ही देशांमधील सामायिक हितसंबंधांकडे लक्ष वेधलं. राजदूतांनी नवी दिल्ली आणि तेहरानमधील व्यापक संबंधांबद्दलही भाष्य केलं आणि ते मैत्री आणि सहकार्याचे संबंध असल्याचं म्हटलं आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कुणाचा ताबा?
होर्मुझ सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण आणि दक्षिणेला ओमान व संयुक्त अरब अमिराती हे देश आहेत. ही सामुद्रधुनी उत्तरेकडील पर्शियन आखाताला दक्षिणेकडील ओमानच्या आखाताशी जोडते आणि त्यानंतर ती अरबी समुद्रात विलीन होते. या सामुद्रधुनीची लांबी सुमारे १६१ किलोमीटर आणि रुंदी सर्वात अरुंद भागात फक्त ३३ किलोमीटर आहे. कोणत्याही वेळेस या मार्गावरून डझनभर तेलवाहू जहाजे ये-जा करीत असतात. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय समुद्र कायद्यानुसार, प्रत्येक देशाला त्याच्या किनारपट्टीपासून १२ नॉटिकल मैल (सुमारे १३.८ मैल) पर्यंतचा भाग नियंत्रित करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ असा की, होर्मुझ सामुद्रधुनीचा सर्वात अरुंद भाग संपूर्णपणे इराण आणि ओमानच्या क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणि प्रवेशाबाबत इराण आणि ओमान यांच्याकडे मोठे अधिकार आहेत. याच गोष्टीमुळे इराणकडून वेळोवेळी या मार्गावरील वाहतूक थांबवण्याची धमकी दिली जाते. या सामुद्रधुनीअंतर्गत इराण त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या भागात कारवाई करू शकतो.
होर्मुझच्या सामुद्रधुनीचे महत्त्व काय?
होर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज सुमारे २० ते २१ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आणि उत्पादनांची वाहतूक केली जाते. अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासनाच्या माहितीनुसार, २०२२ मध्ये या मार्गावरून दररोज सरासरी २१ दशलक्ष बॅरल तेल वाहून नेले गेले, जे जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापाराच्या सुमारे २१ टक्के आहे. OPEC (ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज) सदस्य असलेल्या सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि इराक हे देश बहुतांश याच सामुद्रधुनीतून आशियाकडे कच्च्या तेलाची निर्यात करतात. याशिवाय, जगभरात पुरवला जाणारा एकतृतीयांश द्रवित नैसर्गिक वायूचीदेखील याच जलमार्गातून निर्यात होते. म्हणूनच होर्मुझ सामुद्रधुनीला ‘जगाचे तेलवाहतुकीचे हृदय’ असे म्हटले जाते.
