Donald Trump On Strait of Hormuz : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धविराम झाल्यानंतर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा पार पडली. या चर्चेत अमेरिका-इस्रायल आणि इराणचं शिष्टमंडळ सहभागी झालं होतं. मात्र, या बैठकीत ठोस कोणताही तोडगा निघाला नाही. २१ तास चाललेली ही चर्चा निष्फळ ठरली. ही चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

याचं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला पुन्हा एकदा मोठा इशारा देत थेट होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीचे आदेश दिले आहेत. ‘अमेरिका कोणत्याही जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये प्रवेश करू देणार नाही किंवा बाहेरही पडू देणार नाही’, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

ट्रम्प यांनी रविवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, “होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी तात्काळ लागू होईल. मी जगातील सर्वोत्तम असलेल्या अमेरिकेच्या नौदलाला, आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणला कोणतंही शुल्क दिलेल्या कोणत्याही जहाजाचा शोध घेऊन त्याला अडवण्याचे निर्देश दिले आहेत. अशा जहाजांना खुल्या समुद्रातून सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही. तात्काळ प्रभावाने ही प्रक्रिया सुरू केली जाईल”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

“इराणने जलमार्ग खुला ठेवण्याच्या आश्वासनांचं पालन केलेलं नाही आणि सुरुंगांच्या धमक्यांमुळे जहाजांच्या हालचाली आधीच थांबलेल्या आहेत. कारण तिथे कुठेतरी सुरुंग असू शकतात. त्यामुळे कोणता जहाज मालक अशा प्रकारचा धोका पत्करू इच्छितो?”, असा सवालही ट्रम्प यांनी केला.

अमेरिका-इराण युद्धाच्या शांतता चर्चेबाबत बोलताना ट्रम्प यांनी म्हटलं की, “इस्लामाबादमध्ये इराणी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या जवळपास २० तास चाललेल्या प्रदीर्घ चर्चेत अनेक मुद्द्यांवर एकमत झालं. मात्र, इराणच्या अणुकार्यक्रमाच्या एकमेव महत्त्वाच्या मुद्द्यावर तो करार अयशस्वी ठरला. बाकी बैठक चांगली झाली, बहुतेक मुद्द्यांवर एकमत झालं. पण जो एकमेव महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे अणुऊर्जा. इराण आपल्या अणुऊर्जाविषयक महत्त्वाकांक्षेवर अढळ आहे”, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

“होर्मुझ सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांकडून कोणतंही शुल्क घेणं ही जागतिक खंडणी आहे. अमेरिका इराणला या बेकायदेशीर कृत्यातून नफा मिळवू देणार नाही. इराणला टोल देत असल्याचा संशय असलेल्या जहाजांना अमेरिकी नौदल सक्रियपणे रोखेल. तसेच जो कोणी इराणला बेकायदेशीर टोल देईल त्याला खुल्या समुद्रात सुरक्षित मार्ग मिळणार नाही”, असा इशाराच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.