US-Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाला तब्बल २० दिवस होऊन गेले आहेत. मात्र, अद्यापही हे युद्ध सुरू असून दररोज अमेरिका-इस्रायल इराणवर हल्ले करत आहेत तर इराणही प्रतिहल्ले करत आहे. या युद्धात आतापर्यंत इराणच्या सर्वोच्च नेत्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा आणि लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात इराणचं सर्वाधिक मोठं नुकसान झालं आहे, तरीही इराणने माघार घेतलेली नाही.

इराणने शनिवारी अमेरिकेवर सर्वाधिक लांब पल्ल्याचा हल्ला केला. इराणने हिंद महासागरातील अमेरिकेच्या डिएगो गार्सिया हवाई तळावर अनेक मिसाईल्स डागल्या आहेत. डिएगो गार्सिया हवाई तळ हे इराणपासून तब्बल ४,००० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे इराणची क्षेपणास्त्र क्षमता वाढल्याचं यावरून दिसत आहे. दरम्यान, या युद्धाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

अमेरिका-इराण युद्ध थांबणार असल्याचे संकेत मिळत आहेत. युद्धविरामाबाबत मोठी अपडेट समोर आली असून तीन आठवड्यांच्या संघर्षानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने या युद्धात पुढे काय होऊ शकतं? यावर प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. त्यामध्ये इराणबरोबर शांतता चर्चेच्या शक्यतेचाही समावेश असल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने ॲक्सिऑस (Axios) ने दिलं आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटलं होतं की ते युद्ध थांबवण्याचा विचार करत आहेत. तसेच अधिकाऱ्यांच्या मते हा संघर्ष आणखी दोन ते तीन आठवडे सुरू राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी त्यांचे सल्लागार संभाव्य राजनैतिक प्रयत्नांची तयारी सुरू करत असल्याची माहिती सांगितली जाते.

वृत्तानुसार, राजदूत जेरेड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ हे इराणशी चर्चा केल्यास काय होऊ शकतं? किंवा कोणत्या मुद्यांवर चर्चा होऊ शकते? यावर विचारविनिमय करत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. अधिकाऱ्यांच्या मते कोणत्याही करारामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा पूर्व पदावर आणणं, इराणच्या समृद्ध युरेनियमच्या साठ्यावर तोडगा काढणं, अणुकार्यक्रम, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे यावर दीर्घकालीन आराखडा तयार करण्यासह आदी मुद्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

असं असलं तरी अलिकडच्या दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यात कोणताही थेट संवाद झालेला नाही. मात्र, इजिप्त, कतार आणि यूकेच्या मार्फत संदेशांची देवाणघेवाण झालेली आहे. या मध्यस्थांनी अमेरिका आणि इस्रायलला सांगितलं की इराण वाटाघाटींसाठी तयार आहे. पण कठोर अटींसह. इराण युद्धविराम आणि युद्ध पुन्हा सुरू होणार नाही याची हमी व नुकसान भरपाईची मागणीसाठी ठाम आहे.

दरम्यान, एका अमेरिकी अधिकाऱ्याच्या म्हणण्यांनुसार, अमेरिकेला असा विश्वास आहे की इराण अखेरीस वाटाघाटींच्या टेबलावर येऊ शकतो. अमेरिकेला इराणकडून अनेक अटी मान्य करून घ्यायच्या आहेत. जसं की पाच वर्षांसाठी कोणताही क्षेपणास्त्र कार्यक्रम नाही. तसेच युरेनियम संवर्धन शून्य करणं, नतान्झ, इस्फाहान आणि फोर्डो अणुऊर्जा प्रकल्प बंद करणं, प्रादेशिक देशांशी शस्त्र नियंत्रण करार ज्यात १,००० क्षेपणास्त्रांची मर्यादा आणि हिजबुल्लाह, हुथी आणि हमास यांसारख्या गटांना निधी न देणं.