जून २०२२ मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बंड झालं होतं आणि शिवसेना फुटली होती. मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना आव्हान देत एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता जून २०२६ मध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटणार अशा चर्चा सुरु आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ९ खासदारांपैकी ६ खासदार फुटतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. खासदार संजय राऊत यांनीही काही पोस्ट केल्या आहेत. दरम्यान या चर्चा सुरु असताना खासदार राजाभाऊ वाजे दिल्लीत पोहचले आहेत. त्यांनी काय म्हटलंय आपण जाणून घेऊ.

खासदार संजय राऊत यांची पोस्ट काय?

अपना सपना मनी मनी, महुआजी खासदारांची किंमत प्रत्येकी ५० कोटी अशी ठरली आहे.(पन्नास खोके) १५ कोटी हा फक्त अॅडव्हान्स आहे. खरंतर या लोकांची किंमत ५० हजारही नाही. त्यांना एवढी किंमत मिळते आहे कारण ते शिवसेनेत आहेत. तुमच्या पक्षातल्या लोकांना किंमत मिळाली कारण ते तृणमूल काँग्रेसमध्ये होते. असं म्हणत महुआ मोईत्रांच्या एका पोस्टला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. दोन दिवसांपूर्वीच ऑपरेशन टायगरच्या चर्चा संजय राऊत यांन फेटाळल्या होत्या. तसंच चार दिवसांपूर्वीच सगळे खासदार हे उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत उपस्थित होते. काही थेट आले होते काही जण ऑनलाइन उपस्थित होते. कुणी मुलीची शपथ घेतली, कुणी वडिलांची, आईची शपथ घेतली. कुणी साईबाबांची शपथ घेतली आणि उद्धव ठाकरेंना सांगितलं की तुमच्यावरच आमची निष्ठा आहे. शिवाय कुणी कुणाला भेटलं म्हणून चर्चा का करत आहात? खासदारांनी सांगितलं आहे की आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र आता १५ कोटी अॅडव्हान्स मिळाला असल्याची पोस्टही त्यांनी केली आहे.

राजाभाऊ वाजे काय म्हणाले?

ऑपरेशन टायगर बाबत वगैरे मला काहीही ठाऊक नाही. तसंच खासदार फुटणार वगैरे आहेत का? हेदेखील मला माहीत नाही. मी दिल्लीला राजधानी एक्स्प्रेसने आलोय, माझ्या एका बैठकीसाठी मी इथे आलो आहे. मला कुणीही संपर्क केलेला नाही आणि मी कुणालाच संपर्क केलेला नाही. मला कुणीही फोन केलेला नाही, तसंच मला कुणी कुठलीही ऑफर दिलेली नाही. मी इंडस्ट्री कमिटीच्या बैठकीसाठी आलो आहे. दिल्लीत येणं आधीच ठरलं होतं. मी ट्रेनने आलो आहे, मी काल संध्याकाळी ट्रेनमध्ये बसलो आणि दिल्लीत पोहचलो आहे असं राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं आहे.

पक्ष फुटीच्या चर्चांबाबत कल्पना नाही-राजाभाऊ वाजे

पक्ष फुटीच्या वगैरे चर्चांबाबत मला काहीही ठाऊक नाही. मला विचारलं तर मी इतकंच सांगेन की मी उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे. मी माझ्याबाबत सांगू शकतो, इतर कुणाच्याही बाबत मी सांगता येणार नाही. इतर लोक सोडून जातील का? मला माहीत नाही. मी त्यावर भाष्य करणार नाही. पक्षाचे प्रवक्ते त्याबाबत बोलतील. शिवसेना पक्ष पुन्हा एकदा फुटल्याची जी चर्चा आहे त्याबाबत मला काहीही कल्पना नाही. मी ट्रेनने दिल्लीला आलोय, मला जर कुणी संपर्क केला असता तर मी विमानाने आलो असतो ना? माझ्यावर कुणी दबाव टाकलेला नाही. मी आदरणीय उद्धव ठाकरेंसह होतो, आहे आणि राहणार आहे. मला कुणीही कसलंही प्रलोभन वगैरे काही दिलेलं नाही. मला कुठलाही फोन आलेला नाही. शिवसेना दुसऱ्यांदा फुटणार का? मला काहीही माहीत नाही. मी दिल्लीला आज आलोय आणि याच दिवशी चर्चा सुरु आहेत. पण हा एक योगायोग आहे असंही राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं आहे. राजाभाऊ वाजे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

कुठले खासदार एकनाथ शिंदेंसह जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा?

१) संजय जाधव

२) संजय देशमुख

३) नागेश पाटील आष्टीकर

४) ओमराजे निंबाळकर

५) भाऊसाहेब वाकचौरे

६) सहाव्या खासदाराचं नाव समोर नाही

खासदार फुटण्याच्या जोरदार चर्चा मागील दोन दिवसांपासून

मागील दोन दिवसांपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटणार या चर्चा रंगल्या आहेत. याचं कारण उद्धव ठाकरेंनी मुंबईत खासदारांची एक बैठक बोलवली होती. त्यावेळी या बैठकीला काही खासदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे हे खासदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र संजय राऊत यांनी हे वृत्त नाकारले होते. शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी नाही आणि जे खासदार थेट आले नव्हते ते ऑनलाइन उपस्थित होते, सगळ्यांनीच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असं माध्यमांना सांगितलं होतं. २०२२ मध्ये शिवसेनेतले ४० आमदार फुटले होते आणि सगळ्यांना भाजपाने पाठिंबा दिला होता. ज्यानंतर जून २०२२ ते ऑक्टोबर २०२४ असा अडीच वर्षांचा काळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. २०२३ मध्ये या महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पवार पक्षही सहभागी झाला होता. महायुतीने २०२४ च्या लोकसभा निवडणुका लढवल्या पण त्यांना महाराष्ट्रात फारसं यश मिळालं नाही. पण याच महायुतीला राज्यात २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. महायुतीने २३२ जागा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ९ खासदार तर २० आमदार निवडून आले आहेत. आता ९ पैकी सहा खासदार फुटतील अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे २० पैकी १६ आमदारही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जातील अशाही चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबत अद्याप कुणीही अधिकृत भाष्य केलेलं नाही.