Donald Trump on Vladimir Putin: अमेरिकेने व्हेनेझुएलावर लष्करी हल्ला करून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आता कोणत्या राष्ट्राकडे वक्रदृष्टी फिरवणार अशी चर्चा आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना ट्रम्प यांना एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाकडे आणि त्याला ट्रम्प यांनी दिलेल्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष वळले आहे. भविष्यात ट्रम्प यांनाही ताब्यात घेण्याचा विचार करणार का? असा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला होता.

फॉक्स न्यूजचे पीटर डूसी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सदर प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “मला वाटत नाही त्याची गरज भासेल. माझे त्यांच्याशी (पुतिन) नेहमीच चांगले संबंध राहिल आहेत. पण मी खूप निराश आहे. मी आठ युद्ध सोडवली आहेत. मला वाटले होते की, हे युद्ध सोप्या युद्धांपैकी एक असेल.”

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, गेल्या महिन्यात त्यांनी (रशिया आणि युक्रेन) ३१ हजार लोक गमावले आहेत. त्यापैकी बरेच रशियन सैनिक होते. रशियन अर्थव्यवस्था सध्या खराब आहे.

मादुरोंच्या अटकेवर झेलेन्स्कींनी कोणती प्रतिक्रिया दिली?

निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, “मी यावर काय बोलणार? जर हुकूमशहांच्या (मादुरो) बाबत असे केले जाऊ शकत असेल तर अमेरिकेला माहीत आहे की, पुढे त्यांनी करायला हवे.”

झेलेन्स्की यांच्या विधानावर ट्रम्प यांनी असहमती दर्शवली. ते म्हणाले की, पुतिन यांच्याबद्दल मी निराश असलो तरी अशाप्रकारची कारवाईची कोणतीही आवश्यकता नाही. विशेष म्हणजे युक्रेनमधील कथित युद्ध गुन्ह्यांबद्दल हेग येथील आंतरराष्ट्री गुन्हेगारी न्यायालयाने पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलेले आहे.

मादुरो यांची अटक कशी झाली?

नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात अमेरिकेने ३ जानेवारी रोजी पहाटे व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे हल्ला करून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. मादुरो आपल्या बेडरूममध्ये असताना अमेरिकन सैन्यांनी त्यांना बेडवरून फरफटत आणल्याचे वृत्त काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले होते. व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठी ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. या गुन्ह्यासंदर्भात आता मादुरो यांच्यावर अमेरिकेत खटला चालणार आहे.