मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला १७ तारखेपासून सुरूवात झाली आहे. १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात यावा अशी मागणी केली. तसेच अभिनंदन यांच्या मिशांची स्टाइल ही ‘राष्ट्रीय मिशा’ म्हणून घोषित करावी अशीही मागणी त्यांनी केली.

मागील सोमवारी (१७ जून २०१९) रोजी सुरु झालेल्या अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी चौधरी यांनी अभिनंदन यांना पुरस्कार देण्याची मागणी लोकसभेत केली. याबरोबरच अभिनंदन यांच्या मिश्यांची स्टाइल ही राष्ट्रीय मिशा म्हणून घोषित करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी काँग्रेसच्या वतीने केली.

चौधरी यांनी लोकसभेतील आपल्या भाषणामध्ये भाजपावरही निशाणा साधला. ‘टू जी घोटाळा तसेच, कोळसा घोटाळ्यात भाजपाला काही सिद्ध करता आले का?, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना तुम्ही तुरुंगात टाकू शकलात का?, तुम्ही त्यांना चोर म्हणून सत्तेत आलात मग ते इथे लोकसभेत निवडूण येऊन कसे काय बसले आहेत?’, असे सवाल चौधरी यांनी भाजपाला विचारले. चौधरी यांचे भाषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतून काढता पाय घेतला.

अभिनंदन यांचे शौर्य

२६ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई हद्दीत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी फायटर विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात जो संघर्ष झाला त्यामध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ फायटर विमान पाडले. आपल्या मिग-२१ बायसन विमानातून अभिनंदन यांनी आर-७३ मिसाइलच्या सहाय्याने पाकिस्तानला अमेरिकेने दिलेले एफ-१६ हे विमान पाडले. दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने दिलेल्या या विमानाचा पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी वापर केला. मात्र तो प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला. मात्र आकाशात झालेल्या या हवाई लढाईमध्ये अभिनंदन यांचे मिग-२१ पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. भारताने चहूबाजूंनी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताकडे सोपवले.