US Donald Trump to Iran: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणच्या धमक्यांना प्रत्युत्तर दिले आहे. जर माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तर अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह इराणला अमेरिका पृथ्वीवरून नष्ट करेल, असा गर्भित इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रामधील शाब्दिक युद्ध आणखी तीव्र झाले आहे. २० जानेवारी रोजी ट्रम्प यांनी न्यूज नेशनच्या ‘केटी पावलिच टुनाईट’ या शोसाठी मुलाखत दिली. यावेळी इराणच्या प्रश्नावर बोलत असताना त्यांनी म्हटले की, मी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. जर मला काही झाले तर इराणला पृथ्वीवरून नष्ट करण्याचा इशारा दिला.
इराणच्या सशस्त्र दलाचे प्रवक्ते जनरल अबोलफजर शेकरची यांनी अमेरिकेला इशारा दिल्यानंतर ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे. मंगळवारी इराणने ७९ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी दिली होती. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यापासून परावृत्त करण्यासाठी ही धमकी देण्यात आली होती.
जनरल अबोलफजर शेकरची म्हणाले होते, आमच्या सर्वोच्च नेत्याविरोधात जर कुणी आक्रमकपणे हात टाकत असेल तर आम्ही त्यांचे हात कापून टाकतो. तसेच त्यांच्या जगाला आम्ही पेटवून देऊ.”
ट्रम्प यांनी खामेनींना विशिप्त म्हटले
१७ जानेवारी रोजी ट्रम्प यांनी इराणचे ८६ वर्षीय नेते अयातुल्ला खामेनी यांना विशिप्त म्हटले होते. तसेच ते अपयशी शासक असल्याचे सांगून इराणची राजधानी तेहरान येथे हजारो आंदोलकांच्या मृत्यूला तेच जबाबदार असल्याचेही ट्रम्प म्हणाले. काही दिवसांपूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले होते की, इराणमध्ये नवीन नेतृत्व शोधण्याची वेळ आली आहे. कारण एका विशिप्त माणसाने देश चुकीच्या दिशेने नेला असून तेथील हिंसाचार थांबविण्याची गरज आहे.
आर्थिक मंदी आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये डिसेंबरच्या शेवटी हिंसक आंदोलन सुरू झाले. या आंदोलनामागे अमेरिका आणि इस्रायलचा हात असल्याचे इराणने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन काळात जवळपास ४,५०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६,३०० लोकांना ताब्यात घेतले आहे.
