आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनामध्ये स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका, विमानवाहू नौका, स्वनातित विमाने यांच्या कसरती

‘महासागरातून एकात्मता’ या घोषवाक्याचा पुकारा करतानाच, सागरी सुरक्षेसाठी जागतिक मैत्रीचा हात पुढे करणाऱ्या भारतीय नौदलाने जगभरातील नौदल आणि संरक्षणतज्ज्ञांसमोर शनिवारी जगाला अचंबित करणारे शक्तिप्रदर्शन केले. कोलकाता वर्गातील स्टेल्थ विनाशिका, शिवालिक वर्गातील स्टेल्थ फ्रिगेट्स त्याचबरोबर आयएनएस विराट व आयएनएस विक्रमादित्य या बलाढय़ विमानवाहू युद्धनौका, त्यांच्यावरून स्वनातित वेगाने उड्डाण करणाऱ्या मिग-२९के व हॉक विमानांनी सादर केलेल्या चित्तथरारक कसरती आणि स्वयंपूर्ण जैवइंधनाच्या बळावर चालणाऱ्या अतिवेगवान गस्ती नौका या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरल्या. या शक्तिप्रदर्शनाला यशस्वी स्वयंपूर्णतेची एक झालरही प्राप्त झाली होती. अशियाई व प्रशांत महासागराच्या टापूतील सर्वाधिक प्रबळ नौदल हा भारताचा नवा परिचय असल्याची प्रतिक्रिया उपस्थित संरक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली.
सकाळी बरोबर नऊ वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आगमन झाले. नौदलाची मानवंदना व राष्ट्रगीत झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ एकवीस तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर ‘राष्ट्रपतींची युद्धनौका’ असा बहुमान मिळालेल्या ‘आयएनएस सुमित्रा’वरून राष्ट्रपती बंगालच्या उपसागराच्या दिशेने रवाना झाले. या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनामध्ये (आयएफआर) सुमारे पन्नासहून अधिक देशांचा सहभाग असून शंभरहून अधिक युद्धनौका सहभागी झाल्या होत्या. भारतीय नौदलातर्फे आपल्या सामर्थ्यांचे प्रदर्शन करताना स्वयंपूर्ण बनावटीच्या अद्ययावत युद्धनौकांवर विशेष भर देण्यात आला होता. यातील ‘कोलकाता’ वर्गातील स्टेल्थ विनाशिका आणि शिवालिक वर्गातील स्टेल्थ फ्रिगेट्स या दोन्हींचे जगभरातील तज्ज्ञांनी विशेष कौतुक केले. अनेक विदेशी तज्ज्ञांनी पंधरा वर्षांपूर्वी २००१ साली मुंबईत पार पडलेल्या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाबरोबर याची तुलना तर केलीच, पण त्याहीशिवाय गेल्या काही वर्षांत अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आदी ठिकाणी पार पडलेल्या आयएफआरबरोबर याची तुलना करत हे आजवरचे सर्वाधिक अचंबित करणारे आयएफआर असल्याचा निर्वाळाही दिला.
अमेरिकन नौदलाचे मोहीमप्रमुख अ‍ॅडमिरल जॉन रिचर्डसन ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, ‘खुद्द अमेरिकेत किंवा इतरत्रही मी आजवर अनेक आयएफआरमध्ये सहभागी झालो आहे, पण एवढी प्रचंड व्याप्ती असलेले आयएफआर अनुभवण्याची संधी यानिमित्ताने प्रथमच मिळाली. भारताने स्वयंपूर्णतेच्या बळावर प्राप्त केलेले सामथ्र्य तर यातून दिसतेच, पण त्याचबरोबर हे आयएफआर जगातील सागरी सुरक्षेचे महत्त्वही तेवढेच अधोरेखित करते. अशियाई आणि प्रशांत महासागरातील सागरी सुरक्षेसाठी अमेरिका, भारत व जपान कटिबद्ध असून या तिन्ही नौदलांमध्ये अतिशय उत्तम समन्वय आहे.’ याशिवाय दक्षिण चिनी समुद्रातील अमेरिकेच्या नौदलाचा वावर कायम राहणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
जपान व भारत पूर्वापार मित्र असून सागरी सुरक्षा व स्थैर्य यामध्ये या दोन्ही नौदलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करतानाच जपानी स्वसंरक्षक नौदलाचे प्रमुख, अ‍ॅडमिरल तोमोहिसा ताकेई म्हणाले की, प्रस्तुत आयएफआरच्या आयोजनातून भारताने त्यांच्या स्वयंसिद्धतेचे दर्शन घडविले आहे. त्यांची ही स्वयंसिद्धता स्वयंपूर्णतेच्या माध्यमातून आली आहे. भविष्यातही सागरी सुरक्षेसाठी जपान, भारत व अमेरिका एकत्र असतील. येत्या काही काळात आमच्या संयुक्त कवायतीही अपेक्षित आहेत. भारताच्या सामर्थ्यांला जोड मिळण्यासाठी सर्व प्रकारची मदत जपान करेल.
अमेरिकेतील कॉम्बॅट फ्लीट्स ऑफ द वर्ल्डमधील संरक्षणतज्ज्ञ निकोला मुजुमदार म्हणाल्या, ‘‘जागतिक सुरक्षेला सागरी चाचे, दहशतवादी यांच्याकडून असलेल्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी जागतिक पातळीवर नौदलांचे सहकार्य अधोरेखित करणारे असे हे आयएफआर होते. या आयएफआरच्या आयोजनातील सर्व पातळ्यांपासून ते सामर्थ्यांच्या प्रदर्शनापर्यंत सर्वच पातळ्यांवर भारताने आपली यशस्वी मोहोर उमटवली आहे. तब्बल शंभरहून अधिक युद्धनौकांच्या संचलनाचे आयोजन ही अतिशय जिकिरीची गोष्ट असून ते पार पाडण्याची यशस्वी क्षमता भारताने सिद्ध केली आहे. जगातील बडय़ा राष्ट्रांनाही जिकिरीची ठरणारी बाब भारताने सिद्ध करून दाखवली. २००१ ते २०१६ या पंधरा वर्षांत भारताने स्वयंपूर्णतेच्या बळावर जागतिक मजल मारल्याचे यानिमित्ताने जगासमोर आले.’’
जर्मन संरक्षणतज्ज्ञ मायकेल नीट्झ म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांत भारताने प्रचंड मजल मारली आहे. ‘आयएनएस तलवार’ ही भारतीय युद्धनौका रशियन गोदीत तयार झाल्यानंतर जर्मनीमार्गेच भारतात आली. त्या तलवारपासून आत्ताच्या कोलकाता वर्गातील स्टेल्थ विनाशिकांपर्यंतची भारताची मजल केवळ अचंबित करणारी आहे. शिवालिक वर्गातील युद्धनौका तर जगातील अद्ययावत युद्धनौकांमध्ये अग्रणी आहेत. भारताच्या या सामर्थ्यांचा रास्त उपयोग दक्षिण चिनी समुद्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी होईल. तेथील सागरी सुरक्षेचे आव्हान हातळण्याची पूर्ण क्षमता आणि सामथ्र्य भारताकडे आहे हेच या आयएफआरने दाखवून दिले.
जपानी नौदलातील संरक्षणतज्ज्ञ तेत्सुया काकीतानी यांनी कोलकाता, शिवालिक व अगदी अलीकडे दाखल झालेल्या कमोता युद्धनौकांचे कौतुक करत स्वयंपूर्णतेच्या बळावर जगातील प्रबळ नौदल म्हणून भारताने प्राप्त केलेल्या नव्या परिचयाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आजवर अमेरिका, ब्रिटन, चीन, जपान, सिंगापूर आदी ठिकाणी पार पडलेल्या आयएफआरला उपस्थित राहण्याची संधी मिळाली असे सांगून काकीतानी म्हणाले की हे आजवरचे सवरेत्कृष्ट व सर्वात शक्तिशाली आयएफआर होते. आशियाई सत्तासमतोलाच्या दृष्टिकोनातून या आयएफआरला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

राष्ट्रपतींकडूनही शिक्कामोर्तब
जगभरातील एकूणच राजकारण व अर्थकारण पाहता नव्याने उभ्या ठाकलेल्या अपांरपरिक सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वच नौदलांनी त्यांचा मोहरा ‘सहकार्याच्या माध्यमातून सागरी सुरक्षेकडे’ वळविणे आवश्यक आहे असे प्रतिपादन करून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘महासागरातून एकात्मता’ या भारताच्या बदललेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करत त्याचे समर्थन केले. ते म्हणाले की एकूणच बदललेल्या जागतिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी भारतीय नौदलानेही त्यांच्या धोरणात्मक भूमिकेमध्ये बदल केला आहे, एवढेच नव्हे तर सागरी स्थैर्यासाठी भारत निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो असा विश्वास आपल्या कृतीतून जगाला दिला आहे. हिंदूी महासागरातील सुरक्षा आणि स्थैर्य राखण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.