पाकिस्तानला सणसणीत चपराक! F-16 पाडल्याचा हा घ्या पुरावा

इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानचे एफ-१६ फायटर विमान पाडल्याचा सबळ पुरावा सादर केला आहे.

इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानचे एफ-१६ फायटर विमान पाडल्याचा सबळ पुरावा सादर केला आहे. एअर फोर्सने आज पत्रकार परिषद घेतली. त्यात पाकिस्तानचे एफ-१६ पाडल्याचे रडार फोटो दाखवले. बालाकोट एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसली होती.

त्यावेळी झालेल्या डॉगफाईटमध्ये दोन विमाने पडली यात कुठलीही शंका नाही. त्यात एक विमान भारतीय हवाई दलाचे मिग-२१ बायसन होते तर दुसरे पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-१६ विमान होते. रेडिओ ट्रान्सक्रिप्ट आणि इलेक्ट्रॉनिक सिगनेचरवरुन ते स्पष्ट होते असे एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी सांगितले.

पाकिस्तानने २७ फेब्रुवारीच्या डॉगफाईटमध्ये एफ-१६ वापरल्याचेच नव्हे तर त्याचे एक एफ-१६ पाडल्याचे सबळ पुरावे आहेत असे आरजीके कपूर यांनी सांगितले. पाकिस्तानचे एफ-१६ पाडल्याचे यापेक्षाही सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. पण सुरक्षा आणि गोपनीयतेमुळे ते पुरावे सार्वजनिक करण्यावर आमच्यावर मर्यादा आहेत असे एअर फोर्सकडून स्पष्ट करण्यात आले.

पाकिस्तानी सैन्याच्या जनसंपर्क विभागानेच २७ फेब्रुवारीला केलेल्या वक्तव्यातून एअर फोर्सच्या भूमिकेला पुष्टी दिली होती. एक वैमानिक आमच्या ताब्यात आहे तर दोन त्या भागात आहेत असे पाकिस्तानी सैन्याने म्हटले होते याची आठवण आरजीके कपूर यांनी करुन दिली.

इंडियन एअर फोर्सने लष्करी तळांना लक्ष्य करण्याची पाकिस्तानची योजना यशस्वी होऊ दिली नाही. पाकिस्तानी विमानांना इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी पिटाळून लावले. २७ फेब्रुवारीला सकाळी ९.४५ च्या सुमारास पाकिस्तानी फायटर विमाने नियंत्रण रेषेच्या दिशेने येत असल्याचे स्पष्ट झाले. राजौरी जिल्ह्यात कालाल भागात पाकिस्तानची तीन ते चार फायटर विमाने नियंत्रण रेषा पार करुन भारतात आली.

भारतीय रडार कंट्रोलकडून लगेच पीर पंजालच्या उत्तर आणि दक्षिणेला गस्तीवर असणाऱ्या दोन सुखोई-३० एमकेआय आणि दोन मिराज-२००० फायटर विमानांना सर्तक करण्यात आले. पाकिस्तानी विमानांचा मोठा ताफा लक्षात घेऊन लगेच श्रीनगर जवळच्या तळावरुन सहा मिग-२१ विमाने हवेत झेपावली. अत्यंत वेगाने या सर्व घडामोडी घडत असताना महिला अधिकाऱ्याने महत्वाची भूमिका बजावली. डॉगफाईटमध्ये अचानक मिग-२१ विमाने आल्याने पाकिस्तानी हवाई दलाला धक्का बसला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: With evidance india proof pakistan f 16 shot down

ताज्या बातम्या