नीती आयोगाच्या बैठकीनिमित्त  शनिवारी दिल्लीत आलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शहा यांना न भेटताच परत गेल्या. ललित मोदी प्रकरणात त्या अडकल्या असून विरोधकांनी त्यांना खिंडीत गाठले आहे. राजे यांच्यावर दबाव वाढत असून सकाळी साडेनऊ वाजता त्या आल्या व चार तासांनी दिल्लीतून निघूनही गेल्या.
पक्ष सूत्रांनी सांगितले, की राजे यांनी मोदी किंवा शहा यांची भेट मागितली होती की नाही याबाबत कुणालाच माहिती नाही. शुक्रवारी रात्री मोदी व शहा यांची बैठक झाली असून राजे यांचा बचाव पक्षाने मान्य केल्याचे समजते.
राजस्थान भाजपने राजे यांच्यावरील आरोप फेटाळले असून ललित मोदी यांना प्रवास कागदपत्रे मिळावीत यासाठी वसुंधरा राजे यांनी ज्या कागदांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, ते न्यायालयात सादर करण्यात आलेले नाहीत कारण वसुंधरा राजे यांनी अशा कागदावर स्वाक्षरी केलीच नाही, असे सांगून घूमजाव केले.
राज्य भाजपच्या मते ललित मोदी यांची वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत याच्या हॉटेल्समधील गुंतवणूक ही कायदेशीर आहे व ती जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने भाजपवर राजे यांची हकालपट्टी करण्यासाठी दबाव वाढवला असून आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांना मदत केल्याचा आरोप केला आहे.
राजे यांनी गप्प राहणे पसंत केले असून त्यांच्या कार्यालयाने मात्र त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे, त्यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपने वसुंधरा राजे यांना पाठिंबा दिला असून त्या लोकप्रिय नेत्या असल्याचे म्हटले आहे. कारण त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिला आहे.
राजे या २७ जून ते २ जुलै दरम्यान लंडनला जाणार होत्या पण त्यांचा दौरा नीती आयोगाच्या प्रस्तावित बैठकीमुळे रद्द करण्यात आला.