त्विशा शर्मा या ३३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर आता तिच्या वडिलांनी आणि भावाने तिच्या नवऱ्यावर आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्विशाच्या लग्नाला अवघे सहा महिने झाले होते. आता त्विशा शर्माच्या वडिलांनी त्विशाचा नवरा समर्थ म्हणजे शेळीच्या वेशातला लांडगा असल्याचं म्हटलं आहे आणि उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
त्विशाचे वडील काय म्हणाले?
त्विशा आणि समर्थ (त्विशाचा नवरा) यांची भेट डेटिंग अॅपवर झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नापूर्वी साधारण वर्षभर आधी त्विशाने आम्हाला समर्थबाबत कल्पना दिली होती. आम्हीही तिच्या लग्नाला होकार दिला. ज्यानंतर या दोघांचं लग्न झालं. मात्र लग्नानंतर त्विशाचा नवरा समर्थ, तिची सासू गिरीबाला सिंग आणि सासरे या तिघांनीही हुंड्यासाठी माझ्या मुलीचा छळ केला आणि तिला ठार केलं. हल्ली हुंडा या शब्दाला तसा काही अर्थ राहिलेला नाही. मात्र जे अनेक प्रकरणांमध्ये घडलं तसंच त्विशाच्या बाबतीही झालं. काहीतरी आर्थिक अडचण निर्माण करायची आणि पैसे उकळायचे हाच प्रकार सुरु होता. नवनिधी शर्मा यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप केले आहेत.
नवनिधी शर्मा त्विशाचा छळ आणि समर्थबाबत काय म्हणाले?
त्विशा नोकरी करत होती, पण तिची नोकरी काही कारणामुळे गेली. ज्यानंतर तिला टोमणे ऐकावे लागत होते. तसंच तिची सासू आणि तिला नवरा म्हणायचे की तुझी नोकरी गेली आता आम्ही तुला जेवायला कसं घालू? तुला कसं फुकट पोसायचं का? त्विशा आणि समर्थ हनिमूनला गेले होते तिथेही तो तिच्याशी विचित्र पद्धतीने वागला. तिथूनच या सगळ्या गोष्टी सुरु झाल्या. त्विशा आणि समर्थ हनिमूनहून परतत होते. तेव्हा दोघांमध्ये काहीतरी वाद झाला, ज्यानंतर समर्थने त्विशाला ढकललं होतं. तसंच तो तिच्यावर चिडला होता आणि विमानतळावरच त्याने तिच्याशी भांडण केलं होतं. समर्थ म्हणजे शेळीच्या रुपातला लांडगा आहे. हनिमूनहून परतत असताना वाद झाला असेल पण बायकोशी इतकं निर्दयीपणे कसं काय वागू शकला? त्विशाने तेव्हा तिच्या भावाला हे सगळं सांगितलं होतं आणि मी लग्नाचा निर्णय घेऊन चूक केली का असंही विचारलं होतं तेव्हा तिचा भाऊ तिला म्हणाला जाऊदेत लगेच असा विचार करु नकोस की तुझा निर्णय चुकला. कधी कधी माणूस वेगळ्या विचारांमध्ये असतो, चिडू शकतो, दुर्लक्ष कर सोडून दे विषय. ज्यानंतर माझ्या मुलीने विषय सोडून दिला. मुली असंही लग्न वाचवण्यासाठी खूप गोष्टी सोडून देत असतात. त्विशाचा नवरा मात्र तसा नाही तो तिच्याशी लांडग्यासारखा साळसूदपणे वागला. या घरात जी सून म्हणून आधी आलेली मुलगी होती तिनेही घटस्फोट घेतलाय, माझ्या मुलीच्या लग्नानंतर ती पाच महिन्यांनी मरते याचा अर्थ तिचा तेवढा छळ करण्यात आला हे उघड आहे. ती आम्हाला काही प्रमाणात कल्पना देत होती. आम्हीच तिच्या सासरी जाऊन तिला घरी आणायला हवं होतं असंही त्विशाच्या वडिलांनी म्हटलं आहे.

त्विशाच्या आईने काय सांगितलं?
३० एप्रिलला त्विशाने तिच्या आईला मेसेज केला होता. ती म्हणाली की समर्थ तिच्याशी बोलतही नाही. मला तू भोपाळला का पाठवलंस? इथे मला बोलवलं गेलंय म्हणून तू पाठवलं पण आता सगळी नाटकं सुरु झाली आहेत. माझ्या आयुष्याचं आता नाटक झालंय असं वाटतंय असं ती मला म्हणाली होती असं त्विशाच्या आईने सांगितलं. ७ मे रोजी त्विशाने तिच्या आईला मेसेज केला होता की आई तू मला घ्यायला ये आणि इथून घरी घेऊन जा. त्विशाच्या नवऱ्याला तिची काही गरजच उरली नव्हती, कारण त्याने तिच्याशी बोलणंही सोडून दिलं होतं असं त्विशाच्या आईने सांगितलं.
त्विशाने मृत्यूपूर्वी मैत्रिणीला मेसेज करुन काय सांगितलं होतं?
त्विशाच्या वडिलांनी आणि भावाने दिलेल्या माहितीनुसार ती जो त्रास सहन करत होती त्याची कल्पना तिच्या काही मैत्रिणींनाही देत होती. तिच्या एका मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा त्विशाने तिच्याशी संपर्क केला आणि चॅटवर बोलणं झालं तेव्हा तिने सांगितलं होतं की मी इथे अडकून पडले आहे. मला माहेरची आठवण येते आहे. लग्नानंतर नेमकं काय केलं पाहिजे हेच मला समजत नाहीये. मी माझ्या परिने प्रयत्न करते आहे पण कुणी मला समजून घेत नाही, असं तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं होतं. मी इथे अडकून पडले आहे हे तिचे अखेरचे शब्द ठरले असं या मैत्रिणीने सांगितलं.
त्विशाच्या माहेरच्या लोकांचे आरोप काय?
- त्विशा या लग्नानंतर भोपाळला गेली, पण ती खुश नव्हती.
- त्विशा आम्हाला सातत्याने घरी परतायचं आहे, मला इथे करमत नाही असं सांगत होती. पण तिला त्रास होत होता.
- तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधीपर्यंत ती आमच्या संपर्कात होती. नंतर तिचा मृत्यू झाल्याचाच फोन आला.
- त्विशाचा मृतदेह आम्ही पाहिला आणि आमचा थरकाप उडाला कारण तिच्या मृतदेहावर जखमा होत्या.
- पोलिसांनी आम्हाला अपेक्षित सहकार्य केलं नाही. तसंच महिला आयोग आणि मानवी हक्क आयोगानेही नीट सहकार्य केलं नाही.
- त्विशाचा नवरा वकील आहे तसंच तिचे सासरे निवृत्त न्यायाधीश आहेत त्यामुळे त्यांच्या बऱ्याच ओळखी आहेत. ज्यामुळे हे प्रकरण तिचे सासरचे लोक दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्विशाच्या कुटुंबाची मागणी काय आहे?
त्विशाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाने काही सहकाऱ्यांच्या मदतीने आंदोलनही केलं. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्यात यावं अशी मागणी कुटुंबाने केली आहे. तसंच हुंड्यासाठी हा बळी घेण्यात आला त्या अनुषंगाने तपास केला जावा अशीही मागणी मुलीच्या कुटुंबाने केली आहे.
